Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Lok Sabha Election: राज ठाकरेंना उत्साही कार्यकर्त्यांचा 'तो' आग्रह झेपेल, नेमकं काय आहे पत्रात?

Sampat Devgire

Raj Thackeray News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) महायुतीचा भाग होणार आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्ली येथे भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. अशातच नाशिकमधील उत्साही कार्यकर्त्यांनी केलेल्या अनपेक्षित मागणीमुळे राज ठाकरेदेखील गोंधळात पडण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतील अशा चर्चा सुरू आहे. परंतु, यासाठी त्यांच्या अटी काय असणार हे अद्याप गुलदस्तात आहे. ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचे वाटप आणि संभाव्य उमेदवार या संदर्भातील चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, या चर्चेत नेमके काय ठरले? याबबातची माहिती समोर आलेली नाही.

महायुतीतीत मनसे (MNS) सहभागी झाल्यानंतर युतीतील जागावाटपावरून सुरू असणारी रस्सीखेच आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच नाशिकच्या (Nashik) मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी एक पत्र लिहून यात भर टाकली आहे. या कार्यकर्त्यांनी थेट मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिकमधून उमेदवारी घ्यावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे राज ठाकरे निवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस करतील का? किंवा त्यांचे धोरण काय? याचा काहीही विचार न करता उत्साही कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या पत्राने नाशिकमध्ये वेगळीच राजकीय चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MNS

राज ठाकरे यांच्या महायुतीतील समावेशामुळे भाजपला (BJP) काय व किती लाभ होईल हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, यामध्ये एकनाथ शिंदे गटाला जागावाटपात एक पाऊल मागे घ्यावे लागण्याची दाट शक्यता आहे. सातत्याने ठाकरे यांचा नाशिकशी संबंध जोडला जातो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता नाशिक मतदारसंघ मनसेला मिळणार, असा कयास लावला आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी नाशिकमधून उमेदवारी करावी, अशी नवी मागणी पुढे आली आहे. या मागणीला राज ठाकरे कितपत प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मनसेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली होती. त्यात त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. विधानसभेच्या निवडणुकीत शहरातील तीनही आमदार मनसेचे होते. 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे 40 नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पाठिंब्यावर त्यांनी महापालिकेत 5 वर्षे सत्ता ताब्यात ठेवली. पुढच्या निवडणुकीत मात्र या चाळीसपैकी 25 नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये गेले. उर्वरित 10 पराभूत झाले. सध्या या पक्षाचे फारसे अस्तित्व नाशिक शहरात नाही. या स्थितीत भूतकाळाच्या आधारावर वर्तमानकाळात राजकीय इमले बांधण्याचे मनसुबे मनसेचे उत्साही कार्यकर्ते रचत आहेत. हे मनसुबे पक्षाच्या नेत्यांसाठीही अडचणीचे ठरू शकतात, त्यामुळे या कार्यकर्त्यांनी लिहिलेले पत्र राज ठाकरे गांभीर्याने घेतील का? हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.

(Edited By - Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT