Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey News : राज ठाकरेंनी महायुतीसाठी उतरवले 38 शिलेदार मैदानात...

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार असतील, असा कयास होता. मात्र राज्यस्तरावर झालेल्या चर्चेतून ठोस तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार न देता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्या होत्या.

Sampat Devgire

Nashik, 18 April : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता पुढचे पाऊल टाकत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मनसेच्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी राज्यातील ३८ मतदार संघासाठी समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील प्रचार आता संपला आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, अशा सूचना आहेत. याबाबत महायुती आणि मनसे यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. मतदारसंघनिहाय नियुक्त केलेले समन्वयक त्यासाठी प्रत्यक्ष मतदारसंघाचा दौरा करतील, कार्यकर्त्यांच्या बैठक घेतील. ते महायुतीला निवडणूक प्रचारात मदत करणार आहेत. याबाबतच्या सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात मनसेचे कार्यकर्ते इंजिनाचा झेंडा घेऊन महायुतीच्या प्रचारात सहभागी झालेले दिसतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे यांनी नियुक्त केलेले समन्वयक व मतदार संघ असे : नाशिक आणि नंदुरबार : माजी महापौर अशोक मुर्तडक, अभिजीत पानसे आणि जयप्रकाश बाविस्कर. ठाणे : अभिजीत पानसे, पालघर : अविनाश जाधव, भिवंडी आणि कल्याण : आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, पुणे : अमित ठाकरे, राजेंद्र वागस्कर, किशोर शिंदे आणि बाळा शेडगे.

जळगाव आणि रावेर : अभिजीत पानसे, शिरूर : राजेंद्र बाबू वागस्कर, अजय शिंदे. मावळ : नितीन सरदेसाई, रणजीत शिरोळे, अमेय खोपकर रायगड : नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग : शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव. शिर्डी आणि नगर : बाळा नांदगावकर, संजय चित्रे. संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली : बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ : संदीप देशपांडे, राजू उंबरकर. बारामती, सोलापूर, माढा : दिलीप धोत्रे, सुधीर पाटसकर. सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले : बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर.

महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराबाबत अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क कसा करावा, तसेच प्रचारात सहभागी होण्याबाबत असलेल्या अडचणींविषयी वरिष्ठ नेत्यांचे संपर्क केला होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही याबाबत पुरेशी कल्पना आलेली नव्हती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांच्या मनसे कार्यकर्त्यांचा महायुतीच्या प्रचारात फारसा सहभाग दिसत नव्हता. या समस्या सोडविण्यासाठी समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचारात सहभागी होण्याबाबतच्या कोणत्याही अडचणी असल्यास समन्वयकांशी संपर्क करावयाचा आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार असतील, असा कयास होता. मात्र राज्यस्तरावर झालेल्या चर्चेतून ठोस तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार न देता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतील अशी स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT