Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray : पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंनीही साधलं 'टायमिंग'; काळाराम मंदिराला भेट देणार

MNS Vardhapan Din : मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार असून या मेळ्यातून राज ठाकरे लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत.

Arvind Jadhav

Nashik News : लोकसभा निवडणुकीत काळाराम मंदिराच्या दर्शनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या सर्वच राजकारण्यांनी श्री काळारामाचे दर्शन घेत विजयाचे साकडे घातले. आता त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडणार आहे. पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ठाकरे यांनी नाशिकची निवड केली असून, यावेळी जय श्रीरामचा नारा देत ठाकरे लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. (MNS Vardhapan Din in Nashik)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत उतरणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कामाला लावले. मनसेचे एक अ‍ॅपही पदाधिकाऱ्यांना दिले असून, त्याद्वारे मतदारांची नोंदणी करून त्यांना पक्षासोबत जोडण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. एकंदरीत राज ठाकरे नाशिकसह अन्य काही जागा लढवतील, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे काळारामाचे दर्शन घेतल्यानंतरच ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 9 मार्चला 18 वर्ष पूर्ण होतील. साधारणत: मुंबई येथेच पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. मात्र, यावेळी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकची निवड केली आहे. वर्धापन दिनाच्या दिवशी दादासाहेब गायकवाड सभागृहात राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. मात्र, 8 तारखेला नाशिकमध्ये दाखल होत राज ठाकरे थेट काळाराम मंदिरात दर्शनासाठी जातील.

दर्शनानंतरच ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यापूर्वी राज्यपाल रमेश बैस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मोदी आणि ठाकरे यांच्या जाहीर सभा सुद्धा दर्शनानंतरच झाल्या. राज ठाकरे सुद्धा हा कित्ता गिरवणार आहेत. राज ठाकरे यांनी आता पक्षाच्या धोरणात हिंदूत्वाचा मुद्दा आणखी धारदार करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच भाग म्हणून वर्धापन दिनानिमित्त आयोजीत दौऱ्याकडे पाहिले जाते आहे.

याबाबत बोलताना शहराध्यक्ष सुदाम कोंबडे म्हणाले की, पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा होतो. मात्र, यंदा राज ठाकरे यांची उपस्थितीत आमच्यासाठी महत्वाची आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असून, पक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला आहे. नाशिककरांचे आणि राज ठाकरे यांचे नाते नेहमीच घनिष्ठ आहे आणि पुढेही राहणार आहे.

दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राज्यभरातून पदाधिकारी येतील. काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असे कोंबडे म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात किती जागा लढवणार आणि नाशिकसाठी कोणत्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT