Ahmednagar News : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उद्या बुधवारी नगर शहराच्या दौऱ्यावर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. अमित ठाकरेंनी नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. तशी, चर्चा देखील नगर शहरात रंगलीय.
यामुळे 'मनसे'च्या फादर बॉडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अमित ठाकरेंनी उमेदवाराबाबत निर्णय घेतल्यास आणि तसा जाहीर केल्यास, फादर बॉडीमधील वरिष्ठांनी राज ठाकरेंकडे जाण्याचे नियोजनात ठेवल्याचे खात्रीलायक सांगितले जात आहे. त्यामुळे नगर शहराच्या दौऱ्यावर येत असलेले अमित ठाकरेंचा दौऱ्यात बऱ्याच राजकीय उलथापालथी होणार, असे संकेत मिळालेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) बुधवारी नगर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत, तसेच विद्यार्थी सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्ती त्यांच्या हस्ते केल्या जाणार आहेत, अशी माहिती मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी अमित ठाकरे यांनी नगरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी 'मनविसे'मध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यामध्ये निवडलेल्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.
अमित ठाकरे यांचा हा दौरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे नगरमध्ये या दौऱ्याला खूप महत्त्व आले आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या दौऱ्यात 'मनविसे'मध्ये दुफळी उफाळून आली होती. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, देविदास खेडकर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरेंचा दौरा यशस्वी केला. यात सुमित वर्मा यांनी चांगलीच ताकद दाखवली. परंतु नितीन भुतारे बाजूला पडले. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुजय विखेंवर (Sujay Vikhe) थेट निशाणा साधल्याने, पुढे त्यांचे पक्षातील कामकाज थांबवले.
दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला 200 ते 225 जागा लढवण्याची तयारी केली आहे. यात अहमदनगरमधील 12 विधानसभा मतदारसंघात मनसेकडून चाचपणी सुरू आहे. अमित ठाकरे नगर शहर दौऱ्यावर येत असून, त्यात ते 'मनविसे'च्या नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती जाहीर करणार आहेत. याचवेळी ते नगर शहर विधानसभा निवडणुकीची चाचपणी करणार आहेत. 'मनसे'च्या फादर बॉडीपेक्षा 'मनविसे' नगर शहरात झुकते माप गेल्या काही दिवसांपासून मिळत आहे. अमित ठाकरेंचा सहा महिन्यातील दुसरा दौरा तेच दर्शवतो. त्यामुळे 'मनविसे'ला नगर शहर विधानसभा मतदारसंघांत संधी मिळणार, अशी चर्चा आहे.
अमित ठाकरेंचे 'मनविसे'ला झुकते माप 'मनसे'च्या फादर बॉडीला अस्वस्थ करणारे ठरू लागले आहे. यातून 'मनसे'ची फादर बॉडीने राज ठाकरेंकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे अमित ठाकरे नगर शहर दौऱ्यात आणि दौऱ्यानंतर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
अमित ठाकरे या दौऱ्यात विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नगरमध्ये गाठीभेटी घेणार आहेत. अमित ठाकरे नगर शहराच्या तारकपूर भागातील व्ही स्टार हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजता येतील आणि त्यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड व अभिनंदन सोहळा होणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता दिल्लीदरवाजा भागातील ‘राजगड’ या विद्यार्थी सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल, अशी माहिती सुमित वर्मा यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.