Ramdas Athawale and Sadashiv Lokhande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Loksabha Constituency : रामदास आठवलेंच्या शिर्डी दौऱ्यामुळे खासदार लोखंडेंसह समर्थकांमध्ये अस्वस्थता?

Ramdas Athawale and Sadashiv Lokhande : जाणून घ्या, नेमकं काय कारण आहे?

Pradeep Pendhare

Loksabha Election : नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची आणि ती जिंकायची ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची इच्छा आहे आणि तशी त्यांनी जाहीर देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. यामुळे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरल्याचे दिसत आहे.

रामदास आठवले(Ramdas Athawale) यांचा आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात नगर जिल्हा निरीक्षण आढावा दौरा नियोजित होत आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी कार्यकर्ते देखील सरसावले आहेत. यासाठी शनिवारी (ता. 20) राहुरी फॅक्टरी येथे दुपारी 1 वाजता नगर जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक होत असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आणि राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीसाठी नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाघचौरे, बाळासाहेब गायकवाड, नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, अमित काळे, जिल्हा प्रमुख संघटक राजू गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी नगर दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नगर उत्तरचे युवक अध्यक्ष पप्पू बनसोडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

महायुतीचा मेळावा नगर शहरात नुकताच झाला. या मेळाव्यात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याच्या व्यासपीठावर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना संधी देण्याची जाहीर मागणी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे(Sadashiv Lokhande) उपस्थित होते. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच समोर ही मागणी केल्याने त्यांची कोंडी झाली होती.

यावेळी भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe) यांनी हस्तक्षेप करत हा मेळावा भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची आणि योजनांची माहिती देण्यासाठी आहे. याचे राजकीय मागणीचे व्यासपीठा बनवू नका, असे सुनावले होते. मंत्री विखेंच्या हस्तक्षेपामुळे खासदार लोखंडे यांची बाजू सावरली गेली. परंतु मंत्री आठवले यांचा हा दौरा लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने होत असल्याने राजकीय गणिते बदलणार, असे चित्र आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT