MPSC paper leak Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MPSC Paper Leak : परीक्षा घोटाळ्याचे केंद्र MPSC कार्यालय; मुख्य समन्वयकच सूत्रधार, धक्कादायक माहिती आली समोर

MPSC Paper Leak Investigation : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे समन्वयक अधिकारी विश्वेश्वर नकाते यांनी यामध्ये सूत्रधाराची भूमिका बजावल्याचे कळते. तज्ज्ञांनी राज्य आयोगाला २९४ प्रश्नांचा संच दिला होता. हा संच नकाते यांनी चोरला. कार्यालयाच्या पार्किंगमधून तो अवर सचिव अभिजीत तोंडवे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Sampat Devgire

Nashik News, 09 Oct : राज्यभर एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि आंदोलन सुरू आहे. यामुळे आयोग अडचणीत आला आहे. परीक्षेचे पेपर फोडण्याचे केंद्र आयोगाचे कार्यालय असल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागातर्फे सुरू आहे. या आंतरजिल्हा घोटाळ्याच्या चौकशीत नाशिक हे पेपर विक्रीचे केंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या चौकशीत नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील इमारतीतील सदनिकेतून या प्रश्नपत्रिकेची विक्री झाल्याचे समोर आले आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा हा पेपर पाच लाख रुपयांना विकण्यात आला. व्हॉट्सॲपद्वारे तो विद्यार्थ्यांमध्ये वितरित झाला.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे समन्वयक अधिकारी विश्वेश्वर नकाते यांनी यामध्ये सूत्रधाराची भूमिका बजावल्याचे कळते. तज्ज्ञांनी राज्य आयोगाला २९४ प्रश्नांचा संच दिला होता. हा संच नकाते यांनी चोरला. कार्यालयाच्या पार्किंगमधून तो अवर सचिव अभिजीत तोंडवे यांना दिला. तोंडवे यांनी तो गोपाळ मराठे यांना, तर मराठे यांनी प्रवीण पाटील यांना दिल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याचे कळते.

प्रवीण पाटील यांना औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाल्यानंतर त्यांनी तो नाशिक येथे आणला. नाशिक येथील मयूर ठाकरे यांना पाथर्डी फाटा येथील इमारतीतील सदनिकेत पाच लाख रुपयांना विकल्याचे स्पष्ट झाले आहे. मयूर ठाकरे यांनी पुढे हा प्रश्नसंच अमृत पाटील आणि ऋतुजा पाटील यांना दिला. ऋतुजा पाटील हिने प्रश्नसंच मिळाल्यानंतर मोबाईलवरून त्याची छायाचित्रे काढून लोकेश आणि गौरव पाटील या नाशिक व अमरावती येथील सहकाऱ्यांना दिली. अशा प्रकारे एमपीएससीच्या परीक्षेचा पेपर फोडण्यात आला. एमपीएससीच्या मुख्य कार्यालयातूनच पेपरफुटीची सूत्रे हलवण्यात आली. त्यामुळे आयोगाची प्रतिमा संकटात आली आहे.

प्रश्नपत्रिका मिळालेल्या ऋतुजा पाटील हिने उत्तरपत्रिका तसेच प्रत्यक्ष मुलाखतीत त्याचा वापर केला. त्यामुळे ती हंगामी गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर आल्याचे उघड झाले आहे. या धक्कादायक प्रकरणाची सूत्रे नाशिक येथून हलवण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे सदनिकेची तपासणी केली. संबंधित विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यातून हा प्रकार उघड झाल्याचे नाशिकच्या एका वृत्तपत्रातील बातमीतून स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT