Muktainagar election, Eknath Khadse vs Chandrakant Patil, BJP strategy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MuktaiNagar Election : एकनाथ खडसेंचा संशयास्पद 'यु-टर्न'; 'मविआ'चे नेते अजूनही हँग : मुक्ताईनगरात भाजपला मतदानापूर्वीच 'बाय'

Muktainagar Election : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी भाजपकडून उतरवलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी एकनाथ खडसेंची मदत होण्याची शक्यता आहे. परिणामी, ही निवडणूक खडसे अन् त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार चंद्रकांत पाटलांतील पारंपरिक लढतीचे पालिका ‘व्हर्जन’ आहे.

सचिन जोशी

Muktainagar News : मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गटाविरोधात माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तुल्यबळ लढत देतील, अशी अपेक्षा असताना खडसेंनी त्यांच्या पक्षाची शहरात ताकद नसल्याचे सांगत अनपेक्षित माघार घेतली. दुसरीकडे, केंद्रात मंत्री असलेल्या त्यांच्या स्नुषा रक्षा खडसेंना निवडणूक मैदानात उतरवत भाजपच्या विजयाचा निर्धार केलाय. त्यामुळे स्वाभाविकच खडसेंनी सुनेसाठी माघार घेतल्याची चर्चा होऊ लागली आहे.

मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील तर खडसे परिवाराचेच प्रतिस्पर्धी. त्यामुळे रक्षा खडसेंनी भाजपकडून उतरवलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी एकनाथ खडसेंची मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, ही निवडणूक म्हणजे खडसे-चंद्रकांत पाटलांमधील पारंपरिक लढतीचे पालिका ‘व्हर्जन’ आहे, असेच म्हणावे लागेल.

निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो की, अगदी पालिकेचा रणसंग्राम. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे संत मुक्ताईच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव प्रत्येक वेळी चर्चेत असतं. राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसेंचा प्रभाव असलेला हा विधानसभा मतदारसंघ. मात्र, 2019 ला भाजपने खडसेंना उमेदवारी नाकारल्यानंतर व तेथून त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसेंचा पराभव झाल्यानंतर हा मतदारसंघ खडसेंकडून गेला, तो 2024 च्या निवडणुकीतही त्यांना परत मिळवता आला नाही.

रावेर लोकसभा क्षेत्रातील जवळपास चार- पाच मतदारसंघांत आजही खडसेंचा प्रभाव आहेच. म्हणूनच निवडणूक कुठलीही असली तरी खडसेंच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष असते. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत खडसेंनी भाजप प्रवेश करीत असल्याचे सांगत, सुनबाई रक्षा खडसेंचा उघड प्रचार केला. नंतर स्थानिक नेत्यांनी भाजप प्रवेश रोखल्याचे सांगत खडसेंनी विधानसभेला कन्या रोहिणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार गट) प्रचार केला.

‘पालिके’त पुन्हा भूमिका बदल

आता पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत खडसे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांविरोधात ताकदीने लढतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी मुक्ताईनगर शहरात पक्षाची ताकद कमी असल्याचे सांगत निवडणुकीतून माघार घेतली. खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे या केंद्रात राज्यमंत्री आहेत. पक्षाने त्यांना नंदुरबार जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी नेमले आहे. पण मंत्री म्हणून गावातील पालिकेत सत्ता हवी, निवडणुकीत पक्षाची चांगली कामगिरी हवी म्हणून रक्षा खडसेंना प्रयत्न करावे लागणार हे नक्की. त्यामुळे रक्षा यांनी सर्व १७ जागांवर उमेदवार देत नगराध्यक्षपदासाठी भावना ललित महाजन यांना रिंगणात उतरवले आहे.

‘सुनेसाठी सोयीचे राजकारण’

खडसेंनी त्यांच्या पक्षाकडून माघार जाहीर केल्याने त्यांच्यावर विरोधक, विशेषत: आमदार चंद्रकांत पाटील टीका करीत आहेत. सुनेसाठी सोयीचे राजकारण म्हणून खडसेंनी माघार घेत असल्याची टीका होत आहे. काँग्रेसनेही खडसेंनी ‘महाविकास आघाडी’चे निवडणुकीत नेतृत्व करणे अपेक्षित असताना सुनेसाठी माघार घेतल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षात महिला प्रदेशाध्यक्षा असलेल्या खडसेंच्या कन्या रोहिणी यांना मुक्ताईनगर शहरातून 850 मतांचे मताधिक्य होते.

तरीही खडसेंनी पालिका निवडणुकीतून माघार घेतल्याने सोयीच्या राजकारणाचा आरोप होणे स्वाभाविक आहे. खडसेंचे कट्टर विरोधक मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी ‘खडसे उत्तर महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी’ वाढविणार होते, आता तर त्यांच्या मुक्ताईनगरातूनही ते लढायला तयार नाहीत’ असे वक्तव्य करत खडसेंना डिवचले.

घराणेशाहीबद्दल आरोप- प्रत्यारोप :

एकनाथ खडसेंनी सुनेला खासदार केले, कन्येला जिल्हा बँकेत ‘चेअरमन’, पत्नी मंदाकिनी यांना दूध संघात ‘चेअरमन’ केले. कन्येला विधानसभेची उमेदवारी दिली. अशा घराणेशाहीचा खडसेंवर आरोप होत असतो. अशात आमदार चंद्रकांत पाटील यांनीही मुलगी संजना यांना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवल्याने त्यांच्यावरही घराणेशाहीचा आरोप होत आहेच. मात्र, खडसेंच्या भूमिकेमुळे आपल्याला नगराध्यक्षपदासाठी मुलगी संजना यांना रिंगणात उतरवावे लागले, असा युक्तिवाद पाटील करत आहेत.

शिवसेना-भाजप नव्हे; खडसे-पाटील लढत

सध्या तरी मुक्ताईनगर पालिकेतील 17 जागांसाठी चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात शिवसेनेचे 17 व दुसरीकडे मंत्री रक्षा खडसेंच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे 17 उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) काही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरात ना महायुती आहे, ना महाविकास आघाडीचे असित्व. या ठिकाणची लढत कागदावर शिवसेना विरुद्ध भाजप अशी दिसत असली तरी प्रत्यक्षात चंद्रकांत पाटील विरुद्ध खडसे अशीच पारंपरिक होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT