

येवल्यात ‘राष्ट्रवादी’चे राजेंद्र लोणारी विरुद्ध शिवसेनेचे रुपेश दराडे असा सरळ सामना येथे होणार आहे. मात्र, ही निवडणूक मंत्री छगन भुजबळ विरुद्ध माजी आमदार नरेंद्र दराडे अन् माजी आमदार किशोर दराडे यांच्यातच वर्चस्वाची लढाई ठरणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवल्याला पैठणीने जशी ओळख दिली, तसेच राज्यातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणूनही येवल्याची राजकीय पटलावर ओळख आहे. या शहराची नगरपालिकेची निवडणूक भुजबळांच्या सहभागामुळे लक्षवेधी बनली आहे. येवला उत्सवप्रिय, तसेच तालमीचे शहर आहे. येथील धोंडिराम वस्ताद तालीम संघाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.
विशेष म्हणजे एवढ्या प्रदीर्घ काळ लोणारी, दराडे, नागपुरे, जावळे, शेख हे कुटुंबीय नेहमीच एक विचाराने राहिले. अनेकदा सामाजिक, राजकीय संघर्ष झाले तरी एकमेकांच्या मदतीला हे सर्व जण धावत आले. आजही गणेशोत्सवात या सर्वांना तितकाच मान-सन्मान मिळतो. मात्र, राजकीय हेव्यादाव्यातून मागील काही वर्षात दराडे-लोणारी यांच्यात दरी निर्माण झाली होती. त्याचा पुढचा अंक म्हणजे थेट दोन्ही कुटुंबीय आता आमने-सामने उभे ठाकले आहेत. कुस्तीच्या आखाड्यात डाव- प्रतिडाव शिकविणारे हे कुटुंबीय आता राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात कसे डाव टाकणार हा चर्चेचा अन् उत्सुकतेचाही विषय बनला आहे.
नगरपालिकेच्या मागच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी भाजप-शिवसेना युतीचे बंडू क्षीरसागर विराजमान झाले होते. त्यावेळी आमदार किशोर दराडे यांची ताकद क्षीरसागर यांच्या कामी आली होती. त्यावेळी भुजबळ कारावासात असल्याने ‘राष्ट्रवादी’ची बाजू थोडी कमकुवत होती. विद्यमान नगराध्यक्ष आमचा असल्याने या पदावर आमचा दावा असल्याची मागणी येथील भाजपने सुरुवातीला केली. भुजबळ मुंबईत उपचार घेत असल्याने माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ व समन्वयक दिलीप खैरे यांनी मात्र नगराध्यक्ष ‘राष्ट्रवादी’चाच होणार हे ठरवून चाचपणी सुरू केली.
त्याचवेळी दराडे बंधूंनी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांना संपर्क साधला. आमदार दराडेंनी आपले पुतणे रुपेश यांच्यासाठी भाजपची उमेदवारी घेत भाजप-शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब घडवून आणले होते. येवला शहर भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असून, पाच-सहा प्रभागांत चांगले वर्चस्व आहे.
त्यामुळे ‘राष्ट्रवादी’सह शिवसेनेलाही भाजपची सोबत हवी होती. पहिल्या ‘इनिंग’मध्ये मात्र भाजप-शिवसेनेची युती अन् भाजपच्या तिकिटावर रुपेश दराडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार महाजनांच्या संमतीने जवळपास निश्चित झाले होते. मात्र, रुग्णालयातून भुजबळ यांनी थेट फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मी स्थानिक आमदार असल्याने भाजपने माझ्यासोबत यावे, अशी गळ घातली. भुजबळ-फडणवीस यांचे स्नेहाचे संबंध असल्याने फडणवीस यांनी भुजबळांच्या विनंतीला मान दिला अन् राष्ट्रवादी-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाले.
येथील भाजपमध्ये दोन-तीन गट सक्रिय आहेत. त्यातच स्थानिक भाजपला थेट नगराध्यक्षपद हवे होते. श्रेष्ठींच्या आदेशाने यावर पाणी फेरल्यानंतर नगरसेवकपदाच्या आठच जागा पदरात पडल्या आहेत. परिणामी पाच वर्षांपासून तयारी करत असलेल्या अनेक इच्छुकांना थांबण्याची वेळ आली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंद शिंदे यांनी स्वतःसह पत्नीचाही उमेदवारी अर्ज दाखल करत दबावाचे राजकारण केले.
माघारीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर व ज्येष्ठ नेते प्रमुख सस्कर आदींनी शिंदेंची मनधरणी करून एक ठिकाणचा अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. असे असले तरी शिंदे ज्या प्रभागात उमेदवार आहे तेथे युती असूनही ‘राष्ट्रवादी’चाही उमेदवार रिंगणात असल्याने सर्व आलबेल नाही, असे दिसते. भाजपमधील मोठा गट दराडे यांच्याशी वर्षांनुवर्षे जवळीक ठेवून आहे.
भुजबळ यांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी ‘विधानसभे’पूर्वीपासूनच तयारी चालवली आहे. त्यातच अध्यक्षपदाचे आरक्षण ‘ओबीसी’ प्रवर्गासाठी निघाल्याने साम-दाम-दंड-भेद या गुणांनी परिपूर्ण उमेदवार शोधताना भुजबळांसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दमछाक झाली. आरक्षणानंतर भुजबळांकडे राजेंद्र लोणारी, दत्ता निकम व राजेश भांडगे हे तीन दमदार इच्छुक होते. त्यात भुजबळ देखील सर्व पाठबळ उभे करणार असल्याने विरोधकांकडे उमेदवार नसल्याने सुरुवातीला त्यांचे पारडे जड वाटले. भुजबळ-दराडे बंधू यांचे राजकीय वैमनस्य गेल्या कित्येक वर्षापासून येवलेकर पाहत आहे. त्यातच दराडे कुटुंबीयांची निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती, मात्र दमदार उमेदवार नसल्याने निवडणूक सहजासहजी भुजबळांकडे जाऊ द्यायची का, या विचारातूनच दराडे यांनी कुटुंबातील उमेदवार दिला आहे.
यापूर्वी जिल्हा मजूर फेडरेशन, कृषी उत्पन्न बाजार समिती, मर्चंट बँक आदी ठिकाणी भुजबळ-दराडे संघर्षाचा अंक दिसून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक रुपेश दराडे विरुद्ध राजेंद्र लोणारी अशी असली, तरी प्रत्यक्षात पडद्यामागे मंत्री भुजबळ विरुद्ध आमदार दराडे असाच सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने दराडे यांच्या पाठीमागे ताकद उभी करत आले आहेत.
नगरपालिकेसाठी शहरात सुमारे 43 हजार मतदार असून सुमारे 80 टक्के ओबीसी मतदार आहेत. यापैकी सुमारे 14 हजार मतदार मुस्लिम बांधवांचे असल्याने दरवेळी हे मते निर्णय ठरतात. 2002 च्या निवडणुकीत तर मुस्लिम समुदायाने एकत्रित येऊन हुसेन शेख यांना थेट नगराध्यक्ष निवडत येवला पॅटर्न राज्यभर चर्चेत आणला होता. विधानसभा निवडणुकीत येथील मुस्लिम समुदायाने नेहमीच भुजबळांना सर्वाधिक मते दिली आहेत. पण यावेळी चित्र वेगळे असून दराडे बंधूंचेही मुस्लिम समुदायात चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माणिकराव शिंदे यांचेही या समुदायात वर्चस्व आहे. शिंदेंनी दराडेंच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली असल्याने दराडेंसाठी ही जमेची बाजू मानली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.