Nashik News, 20 Oct : गेल्या काही वर्षांपासून नाफेड आणि केंद्र सरकारच्या संस्थांकडून होणाऱ्या कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका सत्ताधारी भाजपला बसला होता. मात्र, हा भ्रष्टाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे रास्त भाव मिळावा, यासाठी शेतकरी नाफेड आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करीत आहेत.
तर दुसरीकडे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाकडून गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या कांद्याची खरेदी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याऐवजी परराज्यांतून निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करण्यात आला. हा कांदा गोदामात न पोहोचताच परस्पर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर रेकॉर्डवर हा कांदा खराब झाल्याचे दाखवून मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे यांनी केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्र सरकारच्या संस्थांमधील अधिकाऱ्यांनी हा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्थानिक नाशिकमधील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात आला नाही, तर परराज्यांतून हलक्या प्रतीचा कांदा आणण्यात आला. यातील सुमारे ८० टक्के कांदा खराब झाला. हा कांदा शासकीय खरेदीत समाविष्ट करून गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. सुमारे दोन लाख टन ग्रेड वन दर्जाचा कांदा खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, सुरुवातीला या खरेदीला शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आदेशात दुरुस्ती करून ग्रेड टू दर्जाचा कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच प्रक्रियेतून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कांदा खरेदीचे कंत्राट ठरावीक आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित संस्थांना देण्यात आले. या संस्थांच्या माध्यमातून राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे यापूर्वीच्या चौकशीत सिद्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, यापूर्वीच्या चौकशीतून कोणताही बोध न घेता गैरव्यवहाराचा हाच पॅटर्न पुढे सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे.
खासदार भगरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती केंद्र सरकारच्या पणन विभागाला दिली आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या गैरव्यवहारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट झाल्याचा आरोप कांदा उत्पादक संस्थांनीही केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.