Chhagan Bhujbal, Sameer Bhujbal, Suhas Kande  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : कांदे की भुजबळ कोणाचा हात धरावा? नांदगावात भाजप पुढे मोठा पेच

Nandgaon Municipal Election : समीर भुजबळ यांनी भाजपकडे युतीसाठी प्रस्ताव ठेवला आहे, दुसरीकडे आमदार सुहास कांदे यांचेही गिरीश महाजन यांच्यासोबत बोलणे झाले आहे. कांदे की भुजबळ कोणासोबत युती करावी हा भाजपपुढे पेच आहे.

Ganesh Sonawane

नांदगाव : सजीव निकम

गेल्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांनी भाजपसोबत युती न करता सतरापैकी अकरा जागा जिंकून शिवसेनेला लक्षणीय बहुमत मिळवून दिले होते. मावळत्या पालिकेच्या सभागृहात दिसणारे राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक यंदा शिवसेनेकडून इच्छुक आहेत तर गेल्या निवडणुकीत स्वतंत्र लढणारी भाजप यावेळी शिवसेना की राष्ट्रवादीसोबत जावे अशा संभ्रमात आहे.

नांदगाव पालिकेच्या निवडणुकीला अजून रंग चढलेला नाही. सोमवार (ता.१०) पासून नामनिर्देशन दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या पातळीवर आता इच्छुकांच्या मुलाखती, अर्ज भरून घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सर्वाधिक ओढा शिवसेनेकडे असून जवळपास दहा प्रभागासाठी शंभरहून अधिक इच्छुकांनी आमदार कांदे यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले आहेत.

गेल्या निवडणुकीत राजेश कवडे व अरुण पाटील यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदार असलेल्या पंकज भुजबळ यांनी मदत केली नसल्याने नाराज असलेल्या अरुण पाटील यांनी पराभवाचे खापर भुजबळ यांच्यावर फोडत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून आमदार सुहास कांदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कवडे-पाटील यापैकी आता कुणाला पसंती मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

किरण देवरे, सागर हिरे, चेतन पाटील अशी काही नावे देखील चर्चेत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांनी आमदार कांदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसकडून मनोज चोपडे हे नाव वगळता सर्व शांतता आहे. राष्ट्रवादीकडून नीलेश गायकवाड यांचे नाव चर्चेत होते, मात्र त्यांच्या कुटुंबात यावेळी कुठल्याही प्रकारची निवडणूक लढायची नसल्याचा निर्णय झाला असल्याने राष्ट्रवादी थेट नगराध्यक्षपदासाठी कुठले नाव पुढे करते हे अजून स्पष्ट व्हायचे आहे.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून माजी नगरसेवक अनिल जाधव यांना निवडणुकीत उतरविले जाणार असल्याची चर्चा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांदे सांगतील तसे करू असे म्हणणाऱ्या इच्छुकांची मानसिकता बघता यंदाच्या निवडणुकीतले वातावरण आतापासूनच एकतर्फी झाल्यासारखे दिसत आहे, याला अपवाद म्हणून शिवसेना (उबाठा) पक्षाचे संतोष गुप्ता हे एकमेव नाव पुढे येत आहे. शिवसेना (उबाठा) कडून थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला जाणार असला तरी खाली प्रभागात कोण पुढे येईल याबद्दलचा संभ्रम आहे.

या निवडणुकीत आमदार कांदे यांच्याकडून रिपाइं आठवले गटाला झुकते माप दिले जात असल्याचे दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या तिकीट वाटपानंतर हे चित्र अधिक मोकळे होण्यासाठी वाट बघावी लागणार असली शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून थेट बंडखोरी करण्याच्या घटना फारशा दिसत नसल्याने यंदाच्या निवडणुकीत सध्या चुरस दिसत नाही. ती कशी असेल किंवा नसेल यासाठी माघारीच्या दिवसापर्यंत वाट बघावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT