

Maharashtra Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला, लासलगाव, नांदगाव, मनमाडमध्ये युतीबाबत भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्याशी काल चर्चा केली. भाजपला सोबत घेऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न समीर भुजबळांचा आहे. पण यात मंत्री गिरीश महाजन यांची गोची झाल्याचे दिसत आहे.
समीर भुजबळ यांचे म्हणणे आहे की, येवल्यात शिवसेनेची ताकद नाही व तेथील शिंदे सेनेचा गट आमच्या विरोधातील आहे. तर, नांदगाव, मनमाडमध्ये देखील विरोधक आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेण्यात उपयोग नाही. त्यामुळे भाजपला सोबत घेऊन नांदगाव व मनमाडमध्ये सुहास कांदे यांना ओव्हरटेक करण्याचा समीर भुजबळांचा प्लॅन दिसतो.
नांदगाव व मनमाड या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्रित जागा लढवाव्यात आणि त्या माध्यमातून शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार सुहास कांदे यांना शह द्यावा या प्रस्तावावर काल समीर भुजबळ व गिरीश महाजन यांच्यात बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुसरीकडे महाजन यांचे आमदार कांदे यांच्यासोबतही निवडणुकीसंदर्भात बोलणे झाले आहे. मात्र समीर भुजबळ व आमदार सुहास कांदे हे कट्टर राजकीय विरोधक असल्याने अद्याप ठोस तोडगा निघू शकलेला नाही. भुजबळ व कांदे दोघांकडून येवला व नांदगाव नगरपालिकेत वर्चस्व राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याशी समीर भुजबळ यांची चर्चा झाली त्यात तोडगा न निघाल्याने भुजबळ यांनी काल गिरीश महाजन यांची भेट घेत चर्चा केली.
गिरीश महाजन व समीर भुजबळ यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भाजप व राष्ट्रवादी शिवसेनेला सोडून युती करत असल्याचे बोलले गेले. मात्र त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. महायुती म्हणूनच निवडणूक लढणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. आमदार सुहास कांदे व भुजबळ या दोघांशी माझी चर्चा झाली असून, कांदे व भुजबळ यांना सोबत घेऊन मधला मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान निवडणूक युतीसंदर्भात मुंबईत मंगळवारी (ता. ११) पुन्हा बैठक होणार असून या बैठकीत महाजन नेमका काय मधला मार्ग काढतात ते पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.