Nandurbar Lok Sabha : नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी दावा ठोकला आहे. मी निवडणूक लढणारच, माघार घेणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर भाजपच्या माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून त्यांनी जागावाटपाचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांच्या चर्चेतूनच होईल, असे स्पष्ट केले.
कोणी काय वक्तव्य केले, याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हणत त्यांनी आमश्या पाडवी यांचे वक्तव्य हलक्यात घेतल्याचे दाखवले आहे. त्या म्हणाल्या, निवडणुकीला अद्याप वेळ आहे.त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार आणि या जागेवरून कोण निवडणूक लढवणार, याबाबत आताच भाष्य करणे उचित ठरणार नाही.
नंदुरबारची जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, याबाबत जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा महायुतीतील घटक पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि त्यानंतरच जागावाटपाचा निर्णय होईल असे मत माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी व्यक्त केले. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वक्तव्यांकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी आमश्या पाडवींना टोला लगावला.
नंदुरबार हा पारंपरिकरीत्या भाजपचा मतदारसंघ राहिला आहे. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. हिना गावित यांचा पराभव झाला. त्यानंतर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांच्याविरोधातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
राजीनामा देऊन मी विधानसभेत काँग्रेसच्या के. सी. पाडवींना पाडले, आता पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी सांगितल्यास लोकसभाही लढवेन,असा ठाम विश्वास पाडवींनी व्यक्त केला आहे. भाजपच्या वाट्याला असलेल्या या जागेवर पाडवींनी दावा केला असला तरी सध्या तरी त्यांचा हा दावा हिना गावितांनी हलक्यात घेतला आहे. मात्र, आगामी काळात या जागेवरुन महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असताना दावे-प्रतिदाव्यांमुळे राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.