Narhari Zirwal
Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नरहरी झिरवाळांच्या संकल्पनेतील पहिला आदिवासी उद्योग समूह दिंडोरीला!

Sampat Devgire

नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिला आदिवासी औद्योगिक समूह टीआयसी दिंडोरीत (Nashik) होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात काल अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्याची घोषणा केली. या प्रकल्पामुळे आदिवासी युवक, व्यावसायिकांना उद्यमी बनण्याची संधी प्राप्त होणार आहे.

प्रस्तावित आदिवासी औद्योगिक समूह ही नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. आदिवासी उद्योजकांना एका छताखाली सुविधा उपलब्ध करून आदिवासी समाजात उद्योजकता विकास घडवून आणणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. त्याला टीआयसी (Trible Industrical cluster ) असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये आदिवासी उद्योजकांना उद्योगाकरिता शेड, वीज, पाणी, रस्ते या सुविधा उपलब्धता करण्याबरोबरच मोठे, मध्यम आणि लहान उदयोग एकाच ठिकाणी विकसित करण्यात येतील.

आदिवासी युवकांना रोजगार उपलब्धीतून कौशल्य विकास साध्य करणे या उद्देशाने त्याची उभारणी करण्यात येईल. जिल्ह्यातील दिंडोरी तालुका मुख्य बाजारपेठेपासून जवळ आणि इतर आदिवासी तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. रस्ते आणि पाणी यांची उपलब्धता यांचा विचार करता त्यात आदिवासी औद्योगिक समुह प्रस्तावित करण्यात आला आहे. तालुक्यातील टोमॅटो, द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांसोबत, तांदूळ, नागली, खुरासणी, वरई ही महत्वाची पिके आहेत. त्यामुळे त्यावर आधारीत विविध प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे शक्य होईल.

तालुक्यात परनॉड रिकॉर्ड, गोदरेज, युबी बेव्हरेज, वरून ॲग्रो, सहयाद्री ॲग्रो, सूला, सिग्राम, एव्हरेस्ट हे उदयोग आहेत. उदयोगांसाठी पोषक वातावरण असल्याने जिल्हा मुख्यालयापासून २३ किमी अंतरावर पेठ, गुजरात राज्य मार्गावरील जांबूटके शिवारात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. आदिवासी‍ औद्योगिक समुहामुळे तसेच सोबतच्या नवीन औद्योगिक क्षेत्रामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास व रोजगार निर्मिती होईल. परिसराच्या विकासाला चालना मिळेल.

पायाभूत सुविधा

आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने उद्योजकांसाठी तयार शेड वितरीत करणे, कृषि प्रक्रिया, इंजिनिअरींग, आदिवासी हस्तकला, लॉजीस्टीक आणि कौशल्य विकास तसेच गाळे या स्वरुपात शेडचे बांधकाम करण्यात येईल. सोबत तांत्रिक पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण, शेती प्रक्रिया उद्योग उभारणी, शेतमालाची स्वच्छता, वर्गीकरण आणि पॅकींग सुविधा, तसेच निर्यातीस चालना देण्याकरिता सहाय्य, प्रशिक्षण आणि वर्कशॉप यूनिट यांची उभारणी करण्यात येईल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT