शिवसेना ठाकरे गटात इन-आउट गेम सुरूच असून नाशिकच्या येवला तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दराडे यांच्यासह त्यांचे काही समर्थक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.
दराडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाचं येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील बळ कमी झालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच ठाकरे गटातील हा बडा नेता शिंदेंच्या गळाला लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयातील महायुतीचे गणित बदलणार आहे. त्याचा फायदा छगन भुजबळ यांना होणार आहे.
येवला हा छगन भुजबळ यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. येवल्यात दराडेंनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भुजबळांपुढे फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे आव्हान उरले आहे. दराडे ठाकरे गटात कायम असते तर भुजबळांपुढे शरद पवार यांच्या गटासोबतच ठाकरे गटाचेही आव्हान राहिले असते. पण, आता भुजबळांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
दराडे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावरुन भुजबळांनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. दराडे बंधू हे इकडून तिकडे उड्या मारायचे काम करतात. एक बंधू सत्तेत असतो, दुसरा सत्तेच्या बाहेर असतो आणि मुलगा शिवसेना पक्षाचा पदाधिकारी म्हणून कार्य करतो. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांशीच ते संपर्कात असतात. मग ज्याच्या हातात सत्ता असते, त्याच्याकडे जाऊन थांबतात अशी टीका भुजबळांनी केली होती.
भुजबळांच्या या टीकेवर दराडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मंत्री छगन भुजबळ यांनी पाच पक्ष बदलले आहेत, त्यामुळे पाच पक्ष बदललेल्या नेत्यांनी माझ्यावर टीका करू नये असं दराडेंनी भुजबळांना ठणकावलं. दराडे बंधू व भुजबळ यांच्यातील या शाब्दिक युद्धामुळे येवला तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा रंगात आले आहे.
1999 मध्ये नरेंद्र दराडे यांनी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा अतिशय कमी म्हणजे केवळ 221 मतांनी शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांच्या हातून पराभव झाला होता. 2004 मध्ये छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात प्रवेशानंतर ही जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली. त्यानंतर दराडेंना म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, 2018 मध्ये दराडेंनी शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषद निवडणूक लढवीत विजय मिळवला, आणि त्यांचे आमदारकीचे स्वप्न साकारलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.