Sunetra Pawar- Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sunetra Pawar : ना भुजबळ, ना पटेल, ना तटकरे ; अजितदादांच्या खास दोस्ताने फिरवली सगळी सूत्र, म्हणूनच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद

Sunetra Pawar DCM Oath : अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी २८ जानेवारीला बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला. त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? उपमुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार? या प्रश्नाचे उत्तर अखेर आज मिळाले. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (दि. ३१ जानेवारी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या सोहळ्याला उपस्थितीत होते.

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद कुणाला मिळणार? याबाबत विविध नावे समोर येत होती. राष्ट्रवादी पक्षात अनेक जेष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्यापैकी एकाला कुणाला तरी हे पद मिळू शकतं, अशी चर्चा होती. पण अचानक सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी अजित पवार यांच्या खास दोस्ताने फील्डींग लावल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवारांचे खास दोस्त व राजकीय सल्लागार असलेले नरेश अरोरा यांची यात प्रमुख भूमिका राहिली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या नरेश अरोरा यांनीच सगळी सूत्र फिरवत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली.

सुरुवातीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु होत्या. अशा परिस्थितीत शरद पवार या बाबत निर्णय घेतील असे वाटत होते. दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली व उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा केली. पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाविषयी सर्वानुमते ठरवू, असं ठरलं.

मात्र, प्रत्यक्षात सुनेत्रा पवार यांना अशा दु:खाच्या प्रंसगात कसं तयार करणार हाही मोठा प्रश्न होता. अशात नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवारांशी संपर्क साधला. सुनेत्रा पवार यांच्या मनाची तयारी त्यांनी केली. पार्थ पवार यांच्याशी देखील त्यांनी बातचीत केली. त्यानंतर आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार आहोत, असं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन अरोरा यांनी मुंबईकडे प्रयाण केलं. त्यानंतर मग भुजबळांनी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. आमदारांची बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करु अशी घोषणा भुजबळांनी केली.

नरेश अरोरा हे अजित पवारांचे निकटवर्तीय सहकारी मानले जातात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून नरेश अरोरा हे अजित पवार यांच्याशी जोडले गेले. अजित पवार यांच्या निधनानंतरही त्यांनी त्यांच्या कुटुंबाची साथ सोडली नाही. विधानसभा निवडणुकीवेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅम्पेन राबवण्याची सगळी जबाबदारी अरोरा यांच्याकडे होती. राज्यात लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचे 'पिंक कॅम्पेन' चालण्यामध्ये प्रमुख भूमिका नरेश अरोरा यांची होती.

अरोरा हे अजित पवार यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करत होते. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अजित पवार यांच्यासोबत संपर्क ठेवला होता. अजित पवारांच्या निधनानंतर फारसा राजकीय अनुभव नसणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी नरेश अरोरांनीच फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी व सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यामागे अरोरा यांचे विशेष योगदान ठरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT