Gokul Zirwal & Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal Politics: झिरवळपुत्राचा संशयकल्लोळ; म्हणे, पक्षाने लढ म्हटले तरच वडिलांविरुद्ध दंड थोपटणार!

Sampat Devgire

Dindori constituency: दिंडोरी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत लक्षवेधी लढत होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील याची चर्चा आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांचा हा निर्णय अनेकांना धक्कादायक होता. दिंडोरी- पेठ विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती पाहता झिरवाळ यांना हा निर्णय कितपत फायद्याचा हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

या निमित्ताने त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवार हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने चर्चेत आहेत. त्यांची चर्चा सातत्याने होत असते. यावर आमदार झिरवाळ यांनी मुलगा व आपल्यात समन्वय आहे. संवाद आहे. असा कोणताही निर्णय होणार नाही, असा दावा केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा नुकतीच दिंडोरी विधानसभा मतदारसंघात येऊन गेली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आमदार झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ हे उपस्थित राहिले. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात देखील गोकुळ झिरवाळ राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटले होते.

तो चर्चेचा विषय झाला होता. त्यावर आमदार यांनी राजकीय बंडखोरीच्या अथवा गोकुळ यांच्या उमेदवारीच्या शक्यता फेटाळून लावल्या होत्या. मात्र मतदारसंघात याबाबात सातत्याने चर्चा होत आहेत. उमेदवारी विषयी अनिश्चितता असली तरीही त्याला नवे राजकीय वळण मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर गोकुळ झिरवाळ यांच्याशी संपर्क केला असता, `मला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्यास मी निश्चितच उमेदवारीसाठी तयार आहे. निवडणूक लढविण्याची माझी इच्छा आहे. यामध्ये कोणाशीही मतभेद अथवा वाद नाही. आमच्या कुटुंबात चांगला समन्वय आहे, असे सांगितले.

गोकुळ झिरवाळ यांच्या या भूमिकेने दिंडोरी मतदार संघात पिता-पुत्र यांच्यात लढत पाहायला मिळेल का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदार नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असतील.

नरहरी झिरवाळ त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे गोकुळ झिरवाळ उमेदवार असतील का? याची उत्सुकता आहे. जागावाटप आणि उमेदवारी या दोन्ही बाबत स्थानिक नेत्यांच्या शब्दाला महत्त्व आहे.

विशेषतः जेष्ठ नेते श्रीराम शेटे याबाबत महत्त्वाची भूमिका बजावतील. निवडणुकीसाठी शेटे यांनी कोणता उमेदवार ठरवला, हे गुलदस्त्यात आहे. मात्र गोकुळ झिरवाळ यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे दिंडोरीत झिरवाळ विरुद्ध झिरवाळ अशी पिता पुत्रांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता पूर्णतः फेटाळण्यात येऊ शकत नाही.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT