Sinnar Constituency News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सिन्नर मतदार संघात होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे इच्छुक आणि कार्यक्रमाचे नियोजनाबाबत विस्कळीतपणा लपून राहिला नाही. त्यामुळे आयोजक स्थानिक नेत्यांवर नाराज झाल्याचे बोलले जाते.
पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांसह विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या यात्रेचा नाशिक जिल्ह्यातील समारोप झाला. यावेळी या मतदारसंघातून संभाव्य उमेदवार कोण? याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र या वेळी इच्छुकांनी बाहेरचा उमेदवार नको, अशी भूमिका घेतली.
त्याचवेळी प्रबळ उमेदवार कोण याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही. सिन्नर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे विजयी झाले होते. त्यांना राजाभाऊ वाजे यांनी प्रखर लढत दिली.
आमदार कोकाटे यांनी गतवर्षी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ते महायुतीचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात उमेदवार कोण याचा शोध सुरू आहे.
शिवस्वराज्य यात्रेत त्याची चाचपणी करण्यात आली. मात्र प्रदेशाध्यक्ष पाटील यांना त्याचे अपेक्षित उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांची निराशा झाली, असे बोलले जाते. मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे भाषण सुरू असतानाच काही उपस्थित निघून गेले.
भाषणा दरम्यान गर्दी पांगल्याने त्यातून एक वेगळाच संदेश गेला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मेळाव्या एवढाच वेळ खासदार राजाभाऊ वाजे यांच्या निवासस्थानी चर्चेत दिला. यावेळी शिवसेनेच्या राजेश गडाख, भरत कोकाटे, डॉ रवींद्र पवार, बाळासाहेब वाघ आदी इच्छुकांनी पाटील यांच्याशी चर्चा केली.
शिवसेनेचे सर्व इच्छुक एकत्र आहोत. सिन्नर मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाला सोडावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र पाटील यांनी त्यांना स्पष्ट नकार न देता सिन्नरचा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडेच आहे, असे संकेत दिले.
या मतदार संघात आमदार कोकाटे हे महायुतीचे उमेदवार असतील. कोकाटे निवडणुकीची राजकीय खेळी खेळण्यात तरबेज आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी सत्तेच्या माध्यमातून अनेक लोक जोडले आहेत.
त्यात उदय सांगळे हा तिसरा फॅक्टर सिन्नरमध्ये यंदाच्या निवडणुकीत उदयास आला आहे. या सर्व घडामोडींमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याचे उत्तर अद्याप कोणालाही मिळालेले नाही.
महाविकास आघाडीच्या जागावाटप आणि संभाव्य उमेदवार यांची चर्चा येत्या ३० सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यानंतरच्या आठवड्याभरात राज्यभरातील मतभेद असलेल्या मतदार संघाचे निर्णय होतील.
त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. सिन्नर मतदार संघात देखील या कालावधीत धक्कादायक निर्णय कानावर येण्याची चिन्हे आहेत. हा निर्णय प्रामुख्याने उमेदवाराबाबत असेल, असे सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.