Nashik BJP News: भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीत अनेक निष्ठावंतांना धक्का दिला. बाहेरून आलेल्यांचे स्वागत करीत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. त्यातून पक्षातील अनेक निष्ठावंतांना पक्षाबाहेर जावे लागले होते.
विरोधकांना कमकुवत करण्याच्या भाजपच्या धोरणाचा फटका सातत्याने निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना बसला आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलण्यात आले. आता पुन्हा ते चक्र उलटे फिरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील निष्ठावंतांवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली. महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने तसेच बडतर्फ केलेल्यांच्या घरवापसीचे संकेत दिले आहेत. या संदर्भात काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेतली आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणावर अन्य पक्षातील नेत्यांना पायघड्या घालण्यात आल्या. अगदी उमेदवारीच्या शेवटच्या टप्प्यातही दिनकर पाटील आणि अन्य भाजपला आरसा दाखवणाऱ्या नेत्यांचे स्वागत करण्यात आले. शहरातील किमान १५ प्रभागांमध्ये त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला.
आता या नेत्यांना आणि बडतर्फ केलेल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात पायघड्या घालण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील महिन्यात या निष्ठावंत मात्र बंडखोरी केल्याने बडतर्फ केलेल्या नेत्यांचे प्रवेश होणार आहेत. त्यात बहुतांशी भाजपचे आक्रमक आणि सक्रिय पदाधिकारी आहेत.
या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाल्यास नव्या समस्या उभ्या राहणार आहेत. अन्य पक्षातून आलेले आणि नगरसेवक झालेले नेते त्यामुळे चिंतेत आहेत. नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये भाजपच्या या निष्ठावंतांचा हस्तक्षेप वाढणार आहे.
या बंडखोरांनी पक्षात प्रदिर्घ काळ काम केलेले असल्याने भाजपची कार्यपद्धती त्यांना माहिती आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे आणि मंत्र्यांकडेही या नेत्यांची चलती आहे. त्यामुळे नगरसेवकांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट विकास कामांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अन्य पक्षातून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या नेते आणि नगरसेवकांची झोप उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.