Manikrao Kokate : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे सख्खे बंधू भारत कोकाटे यांच्यात राजकीय मतभेद आहे. त्याचाच फायदा घेत भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मोठा प्रभाव असलेल्या सिन्नर तालुक्याच्या राजकारणात मोठा डाव टाकला आहे. भाजपने आता कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांना गळाला लावलं आहे.
भारत कोकाटे हे आज (ता. १६) अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या प्रवेशामुळे एकाचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला असा दुहेरी फटका बसणार आहे. त्यामुळे भाजपने एकाच दगडात दोन पक्षांना घायाळ केल्याची चर्चा रंगली आहे.
भारत कोकाटे सध्या सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गावाचे सरपंच आहे. तसेच आतापर्यंत त्यांनी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन व विशेष कार्यकारी सोसायटी या महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले आहे. त्यांनी 2022 मध्ये उद्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर कोकाटे भाजपत जात असल्याने सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
तसेच दुसरीकडे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामुळे सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा चांगला प्रभाव आहे. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमांतिनी कोकाटे यांची आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे भाजपनेही सिन्नर तालुक्यात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली असून अजित पवार यांना त्यांच्या गडातच शह देण्याची तयारी सुरु केली आहे.
भारत कोकाटे यांच्या प्रवेशामुळे सिन्नर तालुक्यात भाजपची ताकद वाढणार आहे. त्याचा फायदा आगामी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला होईल. त्याचा प्रत्यक्ष फटका हा कोकाटे गटाला बसणार आहे. लोकसभा निवडणुकीतही भारत कोकाटे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना साथ दिली होती. भारत कोकाटे यांच्यामुळे आता भाजपला बळ मिळणार असून अजित पवार गटासमोर भाजपच्या रुपाने नव्या प्रतिस्पर्ध्यांचा उदय झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.