Sunil Kedar's Resignation Creates Suspense in Nashik BJP : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेत भाजपमधील संभाव्य उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना न दिल्यामुळे त्यांनी शहराध्यक्ष सुनिल केदार यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात सुनिल केदार यांनी तोंडावर बोट ठेवल्याने सलग दुसऱ्या दिवशीही ससपेन्स कायम राहिला आहे.
सुनिल केदार यांनी आपला राजीनामा झाला आहे किंवा नाही यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. राजीनाम्यासंदर्भात मला माहिती नाही. प्रदेश पातळीवरून अद्याप मला कोणतीही सूचना आलेली नाही. माझे पक्षकार्य नियमीतपणे सुरू असल्याचे सांगत याविषयावर सुनिल केदार यांनी चुप्पी साधली आहे.
एकीकडे केदार यांच्या राजीनाम्यावर संभ्रम कायम आहे. कारण राजीनाम्याच्या चर्चा असल्या तरी ते नियमीतपणे बैठकींना हजेरी लावत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे या पदासाठी इच्छुक असलेल्यांनी लगेचच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीवेळी केदार यांना शहराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. मात्र, तेव्हापासूनच केदार हे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या केंद्रस्थानी राहिले. महापालिका निवडणुकीवेळी उमेदवारीवरुन असलेली पक्षातील धूसफूस, एबी फॉर्म वाटपातील गोंधळ तसेच अर्जांची पळवापळवीमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते.
तसेच महापौर निवडीवेळी अपेक्षित उमेदवाराला संधी न मिळाल्याने केदार यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने समजूत काढल्यानंतर त्यांनी तो मागे घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा स्वीकृतचे प्रकरण आणि या सगळ्या घडामोडी पाहाता केदार यांची विकेट पडेल अशी कुजबुज पक्षात होती. त्यानुसार आता स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेत आपल्याला विश्वासात न घेतल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या नाशिक शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले असून, माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गिरीश पालवे, विक्रांत चांदवडकर, लक्ष्मण सावजी, नीलेश बोरा यांच्या नावांची पक्षात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पक्षाकडून राजीनाम्याबाबत स्पष्टता झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य नाशिक दौऱ्यानंतरच शहराध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून त्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडेल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.