Nashik Gold Scam,Ashok Murtadak Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : धक्कादायक! सोने डबल करून देण्याचे आमिष; माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाला 200 तोळ्यांचा गंडा

Nashik Gold Scam, Ashok Murtadak : 'सोने दुप्पट करून देतो' या आमिषाला कुटुंब बळी पडलं. तब्बल २०० तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाली. माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाला गंडा.

Ganesh Sonawane

Nashik Crime News : घरातील 'सोने दुप्पट करून देतो' या आमिषाला बळी पडल्यामुळे नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल २०० तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अंदाजे सव्वा ते दीड कोटी रुपये फसवणुकीची रक्कम असून, या प्रकरणात संशयित सराफ व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक मुर्तडक यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी माजी महापौर अशोक मुर्तडक यांची संशयित योगेश बाळकृष्ण दाभाडे (रा. नाशिक) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर संशयित दाभाडे याचे मुर्तडक कुटुंबाशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले. त्याने घरातील महिलांचा विश्वास संपादन केला. 'सोने दुप्पट करून देतो' असे आमिष दाखविले.

मुर्तडक यांच्या आई दुर्गाबाई मुर्तडक आणि मावशी विठाबाई धात्रक यांनी त्यांच्या निधनापूर्वी स्त्रीधनातील जुने दागिने कुटुंबातील महिलांना वाटून दिले होते. त्यामध्ये पत्नी आशा मुर्तडक यांना १०० तोळे, मुलगी रोशनी हिला ५० तोळे आणि सून पूजा मुर्तडक यांना ५० तोळे, असे एकूण २०० तोळे सोन्याचे दागिने मिळाले होते. हे सर्व सोने दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून दाभाडे याने १ जानेवारी २०२५ पूर्वी घरातील महिलांकडून सोनं ताब्यात घेतलं.

परंतु सहा महिने उलटल्यानंतरही वाढीव सोने किंवा मूळ दागिने परत न मिळाल्याने महिलांना संशय आला. त्यानंतर त्यांनी हा प्रकार अशोक मुर्तडक यांना सांगितला. त्यानंतर मुर्तडक यांनी संशयिताला घरी बोलावून किमान मूळ दागिने परत करण्याची विनंती केली.

त्यावेळी दाभाडे याने दागिने परत करण्याची ग्वाही दिली. मात्र दीड वर्ष उलटूनही विविध कारणे सांगत त्याने टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुर्तडक यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पंचवटी पोलिसांनी संशयित योगेश दाभाडे याच्याविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

एप्रिलमध्ये दाभाडेकडून मुतर्डकांवर गुन्हा

दरम्यान ,अशोक मुर्तडक यांनी ज्या संशयित योगेश दाभाडे याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्याच दाभाडेने मुर्तडक यांच्या कथित छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याबाबत एप्रिल २०२६ मध्ये पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वर्षभरापूर्वी दाभाडे याने मुर्तडक यांच्याकडून ९० लाख रुपये उसनवार घेतले होते. काही रक्कम परतफेड केल्यानंतर उर्वरित पैशांसाठी मुर्तडक यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सतत तगादा लावत त्रास दिल्याचा आरोप दाभाडेने केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT