

Nashik Crime News : चहाच्या व्यवसायात बरकत यावी व्हावी म्हणून पंचवटी येथील एक महिला जिल्ह्यातील सायखेडा जवळील एका भोंदूबाबाच्या संपर्कात आली. भोंदूबाबाने पीडित महिलेला जादूटोण्याची भीती घालून वारंवार तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर आधीच पहिलं लग्न झालेलं असतानाही संशयित भोंदूबाबाने या पीडित महिलेशी जबरदस्तीने विवाह केला.
लग्नानंतर पीडितेने त्याला घरात जादूटोण्याचा दरबार भरण्यास विरोध केला असता भोंदूबाबाने तिला मारहाण केली. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने पीडितेने पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सदर भोंदूबाबाला सायखेडा पोलीसांनी अटक केली आहे. भोंदू अशोक खरातनंतर नाशिक जिल्ह्यातील हा अशाप्रकारचा आठवा गुन्हा आहे.
पीडित महिला कुटुंबीयांच्या संमतीने विवाह झालेल्या पतीपासून कौटुंबिक कारणातून वेगळ्या राहतात. त्या २०२२ पासून नाशिक शहरातील एका बसआगारासमोर चहाची टपरी चालवितात. पंरतु ग्राहकांचा पाहिजे तसा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. व्यवसायात बरकत व्हावी म्हणून ओळखीच्या लोकांनी तिला निफाड तालुक्यातील दारणा सांगवी येथील भोंदूबाबा यवन भानुदास गोहाड याच्याकडे जाण्यास सांगितलं. ते उपाय देतील असं सांगितलं. त्यानंतर ती या गोहाड बाबाच्या संपर्कात आली.
संशयित भोंदू गोहाड पीडित महिलेच्या घरी आला. त्याने तांदूळ मंत्रून चहाच्या टपरीत फेकायला सांगितले. जडीबुटी देऊन व्यवसायात मोठी भरभराट होईल, असं खोटं आश्वासन दिलं. त्यासाठी तीन हजार रुपये त्याने घेतले. त्यानंतर तो सतत फोन करून पीडितेशी संपर्कात होता.
संशयिताने आधी पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. महावितरण कंपनीत कंत्राटी नोकरीला असल्याचे सांगत त्याने पीडितेला लग्नाची मागणी घातली. लग्न न केल्यास जादूटोणा करून संपवून टाकण्याची भीती दाखविली. त्यामुळे घाबरून पीडितेने संशयित भोंदूबाबाशी ६ सप्टेंबर २०२३ ला घारपुरे घाटावरील श्री साई वैदिक विवाह संस्था येथे वैदिक पद्धतीने विवाह केला. त्यानंतर तो पीडितेबरोबर मखमलाबाद येथे राहू लागला.
लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या नावाखाली त्याने जादूटोणा व तांत्रिक विधींचा बहाणा करत घरातच दरबार भरवू लागला. घरात दरबार भरवण्यास विरोध केला असता पीडितेला त्याने मारहाण केली. त्यामुळे लहान मुलासह पीडिता संशयिताच्या दारणासांगवी गावी राहण्यास गेली. तिथेही त्यानेच तोच उद्योग सुरू केला. गुरुवारी (दि. २) रात्री पुन्हा त्याने मारहाण केल्याने जीवाच्या भीतीने पीडिता घराबाहेर पडली. डायल ११२ वर संपर्क साधल्याने सायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सायखेडा पोलिसांत संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अशोक मोकळ तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.