Bhushan Gavai Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Digital Arrest Scam : नाशिकमध्ये सरन्यायाधीश गवईंच्या नावे 'डिजिटल अरेस्ट', 71 लाख उकळले

CJI Gavai Bhushan name fraud : सायबर भामट्यांनी नाशिकमध्ये हद्द पार केली. थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या फेक कोर्टात डिजिट अरेस्ट करत एका वयोवृद्धाची आर्थिक फसवणूक केली.

Ganesh Sonawane

Nashik News : सायबर गुन्हेगार हे फसवणुकीसाठी सतत वेगवेगळे फंडे वापरत असतात. त्यातीलच डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार आहे. सायबर भामट्यांनी शहरातील एका सेवानिवृत्त वयोवृद्धास महिनाभर डिजिटल अरेस्ट करुन नंतर तुम्हाला सरन्यायधीश भूषण गवई यांच्या सुप्रीम कोर्टात हजर करण्यात आल्याचा बनाव रचत आर्थिक फसवणूक केली.

सायबर भामट्यांनी फिर्यादी वृद्ध व्यक्तिला व्हिडीओ कॉलवर बनावट कोर्टरुममध्ये हजर केलं. न्यायदान मंचावर सरन्यायाधीश बसले असल्याचे भासवले. आरटीजीएसव्दारे एकरकमी तब्बल ७२ लाख रूपये भरणा करण्यास भाग पाडले. तसे केले नाही तर सीबीआयचे पथक तुम्हाला ताब्यात घेईल अशी भिती दाखवली.

विशेष म्हणजे, रक्कम वर्ग करताना बँक कर्मचाऱ्याला संशय आला होता. परंतु सायबर भामट्याने सांगितल्यानुसार वृद्धाने नातेवाईकांना वैद्यकीय मदतीसाठी तातडीने पैसे पाठवायचे असल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध व्यक्तींच्या बँक खात्याची माहिती घेऊन सायबर भामट्यांनी त्यांना कॉल केला. भामट्याला वयोवृद्ध दाम्पत्य घरातच असल्याची माहिती होती. त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे. ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले असून, त्यांनी आयुष्यभराची पुंजी ७२ लाख बँकेत ठेवले होते. परंतु भामट्यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई लंपास केली.

सायबर भामट्याने २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वयोवृद्धास डिजिटल अरेस्ट केले होते. तब्बल पंधरा दिवस सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्टची कारवाई केल्याचे भासवले. व्हाट्सअॅपवर सीबीआयकडून कारवाई करण्यात आल्याची नोटीस पाठवली. भामट्याने वृद्धाला वारंवार व्हॉट्सअॅप कॉल केले. त्यांच्या नावावर मुंबईत क्रेडिट कार्ड काढले गेले आहेत, असे खोटे सांगितले. या क्रेडिट कार्डाद्वारे बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार झाले असून मनी लॉड्रिगमध्ये तुमचा सहभाग असल्याची भीती दाखविली गेली. त्यामुळे ते घाबरले. त्यांनी सायबर गुन्हेगाराने जसे सांगितले तशीच कृती करणे सुरू ठेवले.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

डिजिटल अरेस्ट हा एक सायबर घोटाळा आहे, ज्यात फसवणूक करणारे अधिकारी किंवा पोलीस असल्याचे भासवून, धमक्या देऊन लोकांकडून पैसे उकळतात. हे गुन्हेगार तुमच्याविरोधात अटक वॉरंट आहे किंवा तुमच्या नावावर फसवणूक झाली आहे असे सांगून घाबरवतात आणि पैशांची मागणी करतात. हा फसवणुकीचा नवा प्रकार असून यापासून वाचण्यासाठी सतर्क राहणे आणि संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेसकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचे आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT