Girish Mahajan, Sunetra Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : राष्ट्रवादीच्या मंत्र्याची विकेट पडल्याने महाजनांचे झाले भले, विधानपरिषदेच्या डीलमुळे शिवसेना नेत्याचा दावाही पडला कमजोर

Nashik guardian minister : अखेर नाशिक व रायगडमध्ये गेल्या दीडवर्षांपासून सुरु असलेली धुसफूस थांबली. कुंभमेळामंत्री असलेले गिरीश महाजन यांच्याच गळ्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : राज्यात महायुती सरकार बहुमताने सत्तेत आल्यानंतर १८ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील पालकमंत्र्यांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यात नाशिकची जबाबदारी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, या दोघांच्या नियुक्तीने वाद वाढला आणि सरकारवर दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्थगित करण्याची नामुष्की आली.

गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेला रायगड व नाशिकचा वाद अखेर मिटला आणि १७ जानेवारी २०२६ पासून नाशिकच्या पालकमंत्री पदावर आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना तर रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिवसेना मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाच्या हाती दोन्ही जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याचे पालकत्व न मिळाल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे. विशेषत:नाशिकमध्ये सर्वपक्षीय १५ आमदार आहेत. त्यात एकट्या राष्ट्रवादीचे अर्धे म्हणजे सात आमदार असल्याने राष्ट्रवादीने हक्काने या जागेवर आपला दावा सांगितला होता. यात तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे प्रबळ दावेदार होते. कारण ते दिवंगत नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय नेते होते. भुजबळांना डावलून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं.

जिल्ह्यात सर्वाधिक आमदार या न्यायाने राष्ट्रवादीला नाशिकचे पालकमंत्रीपद सहज मिळवता आले असते. कारण पालकमंत्री पदावर दावा सांगणाऱ्या शिवसेनेकडे केवळ दोनच आमदार होते. तर, भाजपकडे पाच आमदार होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे पारडे निश्चितच जड होते. त्यात अजित पवारांचा वेगळा दबदबा होता,त्यांनी कोकाटे यांच्यासाठी पालकमंत्रिपद खेचूनही आणलं असतं.

परंतु नाशिकमधील ३० वर्षे जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावून ती कायम ठेवल्यामुळे आणि त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांना डिसेंबर २०२५ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. विरोधकांची आक्रमक भूमिका आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर, कायद्याचे राज्य व पुढे आलेला नैतिकतेचा मुद्दा पाहाता अजित पवारांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. कोकाटेंची विकेट पडली अन् तेच मंत्री गिरीश महाजनांच्या पथ्यावर पडलं. कारण पालकमंत्रीपदाच्या रेसमधील एक दमदार स्पर्धक बाद झाला.

अन् दादा भुसेंचा तडजोडीत झाला गेम...

त्यानंतर रेसमध्ये उरले होते ते शिवसेना मंत्री दादा भुसे. दादा भुसे हे पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते कारण मागच्या टर्म मध्ये त्यांच्याकडेच पालकमंत्रीपद होतं. रायगडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यात आलं होतं. तर नाशिकमध्येही शिवसेनेचे दादा भुसे यांना डावलण्यात येऊन गिरीश महाजन यांना पालकमंत्री केल्याने दोन्ही जिल्ह्यांत शिवसेना आक्रमक झाली होती.

विशेषत: रायगडमध्ये भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तब्बल १९ महिने तटकरे व गोगावले यांच्यात धुसफूस सुरु होती. अखेर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत यावर पर्याय निघाला. सुनील तटकरे यांचे सुपुत्र (आदिती तटकरे यांचे बंधू) अनिकेत तटकरे विधानपरिषदेच्या रिंगणात उतरले होते.

दुसरीकडे या जागेवर शिवसेनेचाही दावा होता. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मुलीचा अर्ज भरला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी दळवींना माघार घ्यायला लावत तटकरे पुत्राचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. याच निवडणुकीत तटकरेंनी मुलाच्या आमदारकीसाठी लेकीच्या पालकमंत्रीपदावर पाणी सोडण्याची तयारी दाखवली, तशी डील झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला व नाशिकचे भाजपला असा समझोता झाला आणि त्यातूनच नाशिकमध्ये दादा भुसे यांचा दावा कमजोर पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

थोडक्यात मंत्रिपद गेल्याने कोकाटे बाजूला पडले. रायगडमध्ये झालेल्या डीलमुळे दादा भुसेंचा दावा कमजोर पडला, रायगडचे पालकत्व शिवसेनेला मिळाल्याने दादा भुसेंना नाशिकमध्ये कॉम्प्रमाईज करावं लागलं. तर छगन भुजबळ या रेसमध्ये उशिरा आले होते. त्यांना सुरुवातीला मंत्रिपदापासूनच डावलण्यात आलं होतं. त्यात मागे त्यांच्या केंद्रात जाण्यावरुनही घडामोडी सुरु होत्या. या सगळ्यात भुजबळांनी कधी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर ठामपणे दावा सांगितलाच नाही. या सगळ्यात महाजनांचे मात्र भले झाले. स्थानिक लोकप्रतिनिधींना मागे टाकत कुंभमेळामंत्री असलेले महाजन नाशिकचे पालकमंत्री झाले. तर भुजबळ- भुसे-कोकाटे सगळे साईडला पडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT