Nashik IT Raids News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik IT Raids News : जागरण गोंधळात 108 बोकडांचा बळी अन् 'इन्कम टॅक्स'चा छापा!

Sampat Devgire

Nashik News : दोनच दिवसांपूर्वी नाशिक शहरातील तब्बल 14 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे पडले. यामध्ये नाशिक शहरातील एका बहुचर्चित आणि बड्या बांधकाम व्यायवसायिकाचा समावेश असल्याबाबत चर्चा आहे. या व्यावसायिकाने जागरण गोंधळात 108 बोकडांचा बळी देऊन, सामिष मेजवाणी दिली होती. या व्यावसायिकाचे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराशी अत्यंत जवळीक असल्यामुळे या कारवाईच्या चर्चांना उधाण आले होते. शहरभरात या कारवाईची एकच चर्चा होती. (Nashik IT Raids News)

भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या या कंत्राटदाराची मोठ्या प्रमाणावर कामे शहर आणि अन्यत्र सुरू आहेत. सध्या या कंत्राटदाराच्या घरी लगीनघाई आहे. त्यामुळे सर्वजण डेस्टिनेशन मॅरेजबाबत गोड स्वप्ने रंगवत असतानाच त्यांच्या घरी प्राप्तिकर विभागाचा छापा पडला. हा छापा पडण्यामागे एक वेगळेच कारण चर्चेत आहे. (Latest Marathi News)

संबंधित कंत्राटदाराने गेल्या महिन्यात शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रशस्त अशा मोठ्या डोममध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमासाठी अतिशय जोरदार इव्हेंट करण्यात आला होता. यामध्ये चक्क 108 बोकडांचा बळी देऊन सामिष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाची शहरभर झालेली चर्चा प्राप्तिकर विभागाकडे पोहोचली. त्यातूनच नाशिक शहरांमध्ये प्राप्तिकर विभागाने छापे टाकून कारवाई केल्याचे बोलले जाते. (Latest Political News)

ठाणे येथून आलेल्या चाळीस जणांच्या पथकाने भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराशी संबंधित असलेल्या या कंत्राटदाराच्या ऑफिस तसेच निवासस्थानी दिवसभर छाननी केली. यामध्ये काय आढळले? याची माहिती मिळू शकली नाही. प्राप्तिकर विभागाने देखील याबाबत अधिकृत माहितीपत्रकाद्वारे कळविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र एकूणच भाजपचा 'स्ट्राँग बॅकअप' आणि जागरण गोंधळात बळी देऊनही, इन्कम टॅक्स विभाग प्रसन्न होऊ शकला नाही, असा निष्कर्ष यातून काढला जात आहे. (Nashik Political News)

नाशिक शहरातील 14 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने दोन दिवसांपूर्वी छापे टाकून चौकशी सुरू केली होती. यामध्ये पाच शासकीय कंत्राटदार आणि नऊ बांधकाम व्यवसायिकांचा समावेश आहे. यातील बहुतांश कार्यवाही काल पूर्ण झाली. आता याबाबत प्राप्तिकर विभाग पुढील कार्यवाही करणार आहे. एकंदरच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने केलेल्या या कारवाईत विविध कारणांनी आणि विशेषत: राजकीय कारणांमुळे चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT