Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला आहे. त्यादृष्टीने कुंभमेळ्याच्या तयारीला जिल्हा प्रशासनाकडून वेग आला असून प्रशासन, राजकीय पक्ष आणि अधिकारी वारंवार बैठकांचे आयोजन करत आहेत. कुंभ नियोजनाच्या आखाड्यात उतरण्यासाठी सगळ्यांमध्येच चढाओढ आहे. यात आता राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही उडी घेतली आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या आज गुरुवारी (दि. २५) मुंबईत कुंभमेळा संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेणार आहेत. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला कुंभमेळा आढावा बैठक घेत असल्याने या माध्यमातून आता पोलिस विभागाचीही एण्ट्री कुंभ नियोजनाच्या आखाड्यात झाली आहे.
नाशिक -त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा पर्वाला 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात होणार आहे. 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे. त्यादृष्टीने शहर पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून बंदोबस्ताचे नियोजन सुरु आहे. यासह मनुष्यबळ, वाहनतळ, आखाड्यांचे सेक्टरनिहाय नियोजन सुरू आहे. या नियोजनाचा रश्मी शुक्ला या स्वत: सविस्तर आढावा घेणार आहेत.
सिंहस्थ पर्वणीला किमान 5 कोटी भाविकांची अपेक्षा असून यासह बंदोबस्तासाठी अपेक्षित मनुष्यबळाची आखणी, एआयच्या साहाय्याने इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणी,वाहनतळांचे नियोजन व परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांसाठी सुविधा,वाहतूक मार्गातील बदल व वाहतुकीचे नियोजन हे मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
या आढावा बैठकीसाठी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासह नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, सिंहस्थ सेलचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान कुंभमेळ्याच्या प्रभावशाली नियोजन व अमंलबजावणीसाठी सरकारने आता शिखर समिती व कुंभमेळा मंत्री समितीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिखर समितीचे तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्ष आहेत. नाशिकचे स्थानिक आमदार, मंत्री, खासदार यांचाही या समित्यांमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे आता कुंभ नियोजनाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.