
Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची सगळी सूत्र आता मंत्री गिरीश महाजन यांच्या हातात आली आहे. तसे सुरुवातीपासून महाजन हेच कुंभमेळ्याची सर्व कामे पाहत आले आहेत. त्यात आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या कुंभमेळा मंत्री समितीच्या अध्यक्षपदाचा मान देखील महाजन यांनाच मिळाला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाजनांची नाशिकमधील ढवळाढवळ स्थानिक मंत्र्यांना बोचत असतानाच जळगाव जिल्ह्यातील आणखी एका भाजप आमदाराने आता कुंभमेळा नियोजनात एंट्री घेतली आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने रविवारी मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली 'कुंभ मंथन' बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण हे उपस्थित होते. विशेष म्हणजे नाशिकमधील पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्याशिवाय एकही स्थानिक आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता. परंतु असे असताना आमदार चव्हाण यांनी या बैठकीला आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे नाशिकमधील स्थानिक नेते, आमदार यांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे.
मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी मानले जातात. जळगावच्या राजकारणात तर मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश महाजन म्हणजेच देवेंद्र फडणवीस असे समीकरण मानले जाते. म्हणजे मंगेश चव्हाण यांना दुसरे गिरीश महाजन म्हणूनच संबोधतात. त्यामुळे कुंभमेळ्याच्या आडून आणखी एका जळगावच्या गिरीश महाजनांची एंण्ट्री कुंभ नियोजनाच्या आखाड्यात झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची कुंभमेळा नियोजन बैठकांमधील उपस्थिती विरोधकांसह महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटालाही अस्वस्थ करणारी ठरली आहे. कुंभमेळ्याच्या शिखर समितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कुंभमेळा मंत्री समितीवर गिरीश महाजन अध्यक्ष असल्याने या कुंभमेळा नियोजनावर पूर्णपणे भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. तेही मित्रपक्षांना खटकू लागल्याची चर्चा आहे.
जून महिन्यात नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात महत्वाची बैठक झाली होती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला जोडणाऱ्या प्रमुख महामार्गांच्या पायाभूत सुविधांचा विकास तसेच विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांच्यासोबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हेही त्या बैठकीला उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.