Nashik Kumbh healthcare plan AI
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक कुंभमेळ्यात आरोग्यसेवेचा मेगा प्लॅन ; तपोवनात 100 खाटांचे रुग्णालय, 13 घाटांवर अतिदक्षता कक्ष अन्

Nashik Kumbh healthcare plan : पुढील वर्षी 2027 नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा होणार आहे. द्या दृष्टीने सर्व पातळीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यात कोट्यावधी भाविकांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाणार आहे.

Ganesh Sonawane

Nashik Kumbmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान कोट्यवधी भाविकांना तातडीची आणि सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने व्यापक आरोग्य आराखडा तयार केला आहे. तपोवन येथे १०० खाटांचे रुग्णालय, शहरातील सर्व १३ घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष, ‘रिले सिस्टीम’वर आधारित रुग्णवाहिका व्यवस्था तसेच हजारो अतिरिक्त खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने कुंभमेळ्यातील आरोग्य व्यवस्थेला मोठी ताकद मिळणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी रुग्णालयांची वाढीव क्षमता, घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष, विविध भागांत ओपीडी सेवा तसेच ‘रिले सिस्टीम’वर आधारित रुग्णवाहिका व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

नाशिक शहरातील एकूण खाट क्षमता १ हजार ३०५ वरून १ हजार ९४५ पर्यंत वाढविण्यात येणार असून त्यात १८५ आयसीयू खाटांचा समावेश असेल. तात्पुरत्या आरोग्य सुविधांद्वारे ६४० अतिरिक्त खाटा उभारण्यात येणार आहेत. तपोवन येथे १०० खाटांचे रुग्णालय तसेच नांदूर (साधुग्राम) येथे १० खाटांची सुविधा उभारण्यात येणार आहे. शहरातील सर्व १३ घाटांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते अतिदक्षता कक्ष कार्यान्वित केले जाणार असून २१ ठिकाणी ओपीडी सेवा आणि १९ ठिकाणी रुग्णालये व वैद्यकीय युनिट्स उभारली जाणार आहेत. पार्किंग क्षेत्रांचाही त्यात समावेश असेल.

शहरातील विद्यमान ६२१ खासगी रुग्णालयांमधील १२ हजार ८०२ खाटा तसेच पाच वैद्यकीय महाविद्यालयांतील १ हजार २७५ खाटा या ‘रिझर्व्ह क्षमता’ म्हणून वापरण्यात येणार आहेत. रुग्णवाहिका व्यवस्थेतही मोठी वाढ करण्यात येणार असून २५ नवीन आणि ७३ भाडेतत्त्वावरील रुग्णवाहिका ‘रिले सिस्टीम’द्वारे कार्यरत राहतील.

त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या उपलब्ध असलेली ५० खाटांची क्षमता वाढवून ती १२० पर्यंत नेण्यात येणार असून त्यात २७ आयसीयू खाटांचा समावेश असेल. तात्पुरत्या सुविधांद्वारे ७० अतिरिक्त खाटा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय ४०० खाटांच्या क्षमतेची चार नवीन रुग्णालये प्रस्तावित आहेत. कुंभमेळ्यादरम्यान प्रमुख ठिकाणी तीन महिन्यांसाठी प्रत्येकी तीन खाटांची २५ तात्पुरती रुग्णालये सुरू केली जाणार आहेत. पर्वणी काळात तात्पुरते अतिदक्षता कक्ष कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. येथेही २५ नवीन आणि १६ भाडेतत्त्वावरील रुग्णवाहिका ‘रिले मॉडेल’वर कार्यरत राहणार आहेत.

दोन्ही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर, एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट, एएनएम आणि सहाय्यक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार असून भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही अखंडित आरोग्यसेवा देण्यावर भर देण्यात येणार आहे.

“घाट, पार्किंग, साधुग्राम अशा प्रत्येक ठिकाणी आरोग्यसेवा उपलब्ध ठेवणे हे आमच्या नियोजनाचे केंद्रबिंदू आहे. प्रतिसादाचा वेग, व्यापक कव्हरेज आणि विश्वासार्ह सेवा यावर विशेष भर देण्यात आला आहे,” असे कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

“कुंभमेळ्यादरम्यान वाढणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तात्पुरत्या सुविधा आणि विकेंद्रित आरोग्य सेवा उभारल्या जात आहेत,” असे नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.

“मनुष्यबळ, उपकरणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचे समन्वयित नियोजन करण्यात येत असून गर्दीच्या दिवसांतही तातडीची वैद्यकीय मदत प्रभावीपणे उपलब्ध होईल,” असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी सांगितले. (Nashik News)

कुंभमेळ्यादरम्यान आरोग्य सेवा सुरळीत ठेवतानाच स्थानिक नागरिकांच्या नियमित आरोग्यसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, याचीही दक्षता या आराखड्यात घेण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT