Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : CM फडणवीसांच्या एका निर्णयाने नाशिकच्या राजकीय वातावरणाची हवा टाईट ; लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय वर्तुळाचे लागणार 'लाईट'

Nashik Kumbh Mela, Devendra Fadnavis : सिंहस्थ नियोजनावर आता थेट CMO कार्यालयाकडून देखरेख ठेवली जाणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरु केलं जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून तशा हालचाली सुरु झाल्या आहेत.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela : सध्या नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे सुरु आहेत. परंतु अर्धवट कामांमुळे एकीकडे नागरिक त्रासले आहेत. तर दुसरीकडे टक्केवारी तसेच राजकीय नेते, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाची चर्चा आहे. त्यातून राजकीय गटबाजी देखील वाढत असल्याचं चित्र आहे.

कामांच्या गुणवत्तेवरून तसेच अन्य कारणांवरून कुंभमेळा वादात सापडताना दिसत आहे. कोणत्याही प्रकारच्या वादामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये, कामांत कोणतीही त्रुटी राहू नये व कुंभ नियोजनाच्या कामावर थेट नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांसाठी कार्यालय सुरु केलं जाणार आहे. नाशिकमध्ये, मुख्यमंत्री कार्यालयाचे स्वतंत्र कुंभ नियंत्रण केंद्र स्थापन करण्याची तयारी सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री व समन्वयकांसाठी नाशिक शहरात स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये कार्यालय थाटण्याची तयारी झाली आहे.

हे कार्यालय तयार करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जागेची देखील पाहणी केल्याची माहिती असून आवश्यक सुविधांबाबत प्राथमिक आढावाही घेतला आहे. कुंभमेळा ध्वजानारोहणानंतर किमान एक वर्ष कार्यालय कार्यरत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिकमधील घडामोडींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या काही खास दूतांकडून माहिती घेतली असून, त्यानुसार काही प्रमाणात अधिकारी तसेच लोकप्रतिनिंधींना चाप लावण्याची तयारी सुरु झाल्याचे वृत्त आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या दूतांना नाशिकमध्ये पाठवून पदाधिकारी तसेच आमदारांशी चर्चा केल्याचे देखील वृत्त आहे. यापार्श्वभूमीवरच नाशिकमध्ये स्वतंत्र कार्यालय थाटण्याची तयारी सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकच्या कुंभमेळ्यात आखाड्यांचे प्रशासनाशी असलेले वाद तसेच काही दिवसांपूर्वी २८०० कोटी रुपयांच्या रस्ते कामांमध्ये ठेकेदारांची रिंग झाल्याच्या आरोपावरून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. त्यामुळे कुंभमेळ्याचा नकारात्मक संदेश पोहोचू नये यासाठी सरकारने थेट हस्तक्षेप करण्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी मंत्रालयातून कुंभमेळ्याची जबाबदारी दिलेल्या लोकांनी पाहणी केली असून त्यात राजकीय स्थितीसह कामांचा आढावा घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कुंभमेळ्यातून नाशिक शहरासह जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, नाशिकचे ब्रॅडिंग व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. प्रयागराजनंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेच कुंभमेळा होत असल्याने त्याला प्रयागराजपेक्षा यशस्वी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यामुळेच या कुंभमेळ्याचा विषय त्यांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. थेट मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातल्याने आता नाशिकच्या राजकीय तसेच प्रशासकीय वातावरणाची हवा टाईट झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT