

Pune, 18 July : पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या उन्नत महामार्गाचे काम पुर्ण करण्यासाठी ४ वर्षांची मुदत कंत्राटदारांना दिली आहे. मात्र, २०२९ ला निवडणुका आहेत. आमचे राजकीय आयुष्य पाच वर्षांचे असून दोन वर्ष संपली आहेत. मात्र, ही कामे चार नाही तीन वर्षांतच पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मात्र, काळजीच कारण नाही आम्ही पुन्हा येणारच आहोत, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी करत, ‘मी पुन्हा येणार’चा पुनरूच्चार केला.
सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने पुणे - शिरूर, हडपसर - यवत आणि तळेगाव - चाकण - शिक्रापूर या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उन्नत महामार्गांच्या भूमीपूजन प्रसंगी शनिवारी (ता.१८ जुलै) मुख्यमंत्री फडवणीस बोलत होते.
यावेळी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपूरे, राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित, आमदार खासदार यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘‘ पुणे हे राज्याचे ग्रोथ इंजिन असून, राज्याच्या जीडीपीमध्ये पावणे सात लाख कोटींचे योगदान पुणे आणि पिंपरी चिंचवडचे आहे. या शहरांवरील ताण कमी करण्यासाठी पीएमआरडीए क्षेत्रात नवीन टाऊनशिप उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या शहरांच्या विकासासाठी नवीन फायनांन्शिअल पॅटर्न तयार झाला आहे.
पुरंदरची कनेक्टीव्हीटी वाढविण्यासाठी दिवेघाटातून ट्वीन बोगदा उभारण्याचे नियोजन असून. यातून मेट्रो नेण्याचा विचार आहे. पुरंदर विमानतळाचे विक्रमी कमी वेळेत ९१ टक्के मान्यता मिळून ५० टक्के भूसंपादन झाले आहे. ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण होऊन, निविदा प्रक्रिया करून काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या सर्व विकासकामांमुळे पुणे शहर २०३० चे देशातील उत्तम शहर ग्रोथ इंजिन शहर असेल, असाही दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,‘‘पुणे आण पिंपरी चिंचवड मोठ्या झपाट्याने वाढणारी शहरे आहेत. या शहरांना जोडणाऱ्या नाशिक, सोलापूर, सातारा या महामार्गांवरील वाहतूक कोंडीने मोठे विक्रम केले आहेत. यामुळे ही वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे ५० हजार कोटींची रस्ते बांधणी सुरू होणार आहे. भविष्यात या शहरांवरील ताण कमी करण्यासाठी पुरंदर विमानतळालगत नवीन पुणे वसविण्यात यावे.’’
काही महामार्ग ‘शापा’सारखे मिळाले : गडकरी
काही महामार्गांच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांबाबत बोलताना गडकरी म्हणाले,‘‘ मला काही महामार्ग ‘शापा’सारखे मिळाले आहेत. यामध्ये पुणे-सातारा आणि मुंबई-गोवा महामार्ग आहेत. मात्र, या महामार्गाच्या कामाला गती देऊन पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या,‘‘आज भूमिपूजन होत असलेल्या उन्नत महामार्गांसाठी स्व. अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा, बैठका आणि केंद्र सरकार सोबत समन्वय केला. त्यांच्या दुरदृष्टीमुळे हे महामार्ग विकासाचे गेम चेंजर ठरतील आणि हे दादांच्या स्वप्नपर्तीचे पाऊल असेल. तर नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाची निविदा लवकर काढावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. ब्रिजेश दिक्षित यांनी प्रास्ताविक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.