Eknath Shinde Announces Food Arrangements for 13 Akhadas : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : सिंहस्थाच्या आखाड्यात एकनाथ शिंदेंची एण्ट्री; १३ आखाड्यांतील साधू-महंतांच्या भोजनाची जबाबदारी घेतली

Eknath Shinde Announces Food Arrangements for 13 Akhadas : सिंहस्थ नियोजनात शिवसेनेने उडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी नाशिक- त्र्यंबकेश्वर दौऱ्यात काही महत्वाच्या घोषणा केल्या.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela, Eknath Shinde Announces Food Arrangements for 13 Akhadas : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात भाजपने एकहाती वर्चस्व राखल्याचे चित्र निर्माण झाले असताना आता, शिवसेनेने सिंहस्थाच्या मैदानात उडी घेतली आहे.

सिंहस्थ ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सोमवार (दि.२६) नाशिक दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कुंभमेळा व त्र्यंबकेश्वर क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. सिंहस्थ कालावधीत सर्व १३ आखाड्यांतील साधू-महंतांच्या भोजनाची व्यवस्था शिवसेनेकडून केली जाईल अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

कुंभाच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना पक्की घरे देऊन पुनर्वसन केले जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही. व्यापारी, दुकानदार आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास सरकार मोबदला देईल. साधुग्रामच्या भूसंपादनासंदर्भातील तक्रारीही सोडवल्या जातील. त्र्यंबकेश्वर स्टेडियमसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून निधीचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासकीय भवनासाठी आवश्यक निधी दिला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची क्षमता ५० वरून १०० खाटांची केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितले.

साधू-महंताशी संवाद

नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंदकुंभ संत संमेलनाला उपस्थित राहून कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या संत-महंतांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. जगभरात या कुंभमेळ्याचा डंका वाजेल असा हा सोहळा यशस्वी करू असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

काही लोक १२ वर्षांतून एकदा येणार्‍या कुंभमेळ्यासाठी एवढा खर्च का? म्हणून सवाल करत आहेत. मात्र, सिंहस्थ कुंभमेळा ही हजारो वर्षांची परंपरा आहे. सिंहस्थ हा धार्मिक उत्सव असून त्यामुळे स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. सामाजिक एकात्मता अधिक दृढ होईल तसेच यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा श्रेष्ठ असते. आम्ही कितीही राजकारणी असलो, तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार सुहास कांदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नगरसेवक अजय बोरस्ते, बंटी तिदमे यांच्यासह देशभरातून आलेले विविध आखाड्यांचे साधू-महंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी शिवसेना मदत करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT