Nashik Kumbh Mela  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : बनावट वर्क ऑर्डर पाठोपाठ आता कुंभमेळ्याच्या नावाखाली बोगस भरती ; चक्क कार्यालय थाटलं.. जाहिरात दिसली अन् खळबळ उडाली

Kumbh Mela Fake Recruitment : बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण ताजे असताना आता कुंभासाठी बोगस भरतीच्या नावाने बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela fake recruitment : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या सुमारे साडे पाचशे कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण ताजे असताना आता कुंभासाठी बोगस भरतीच्या नावाने बेरोजगार तरुणांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट भरतीची जाहिरात व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली आरोग्य विभागातील भरतीचे खोटे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्यात आल्याचे समोर आले आहे. भरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच आरोग्य विभागात खळबळ उडाली. पंचवटी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ‘हिलफोर्स फाउंडेशन ॲन्ड मल्टी सर्व्हिसेस’च्या अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्षांसह इतर साथीदारांविरुद्ध सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या स्वाक्षरीच्या बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण नुकतेच उघड झाले. याप्रकरणी नाशिक, मालेगाव येथील पाच जणांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्याचा तपास सुरू असतानाच नव्याने असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

भाड्याने थाटले कार्यालय

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, RTO कार्यालयासमोरील सरस्वती हॉस्पिटलजवळील शॉप क्रमांक ४१० येथे भाड्याने कार्यालय थाटून ‘कुंभमेळा बंपर भरती २०२६-२०२७’ या नावाखाली हा धक्कादायक प्रकार सुरु होता.

संशयितांनी शासनाच्या आरोग्य विभागाची अधिकृत भरती असल्याचे भासवून सोशल मीडियावर भरतीच्या खोट्या जाहिराती प्रसारित केल्या. या जाहिरातींच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना आरोग्य विभागातील नोकरीचे आमिष दाखवून त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी नाशिकमधीलच संदर्भ सेवा रुग्णालयाचे डॉ. योगेश भगवान चित्ते यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंचवटी पोलिस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात हिलफोर्स फाउंडेशन ॲन्ड मल्टी सर्व्हिसेसचे अध्यक्ष सचिन रतन शिंदे (वय २९, रा. वडाळा, ता. देवळा), सचिव नीलेश घोलप (२२, रा. ओतूर, ता. कळवण), उपाध्यक्ष विक्रांत विजय सूर्यवंशी (३०, रा. पेठ रोड) तसेच इतर साथीदारांचा समावेश असून या प्रकरणी नाशिक पोलिस अधिक तपास करत आहेत.

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सोशल मीडियासह विविध माध्यमातून नोकरभरती बाबतच्या अफवा पसरवल्या जात आहे. खोट्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहे. नागरिकांनी अशा खोट्या अफवांना बळी पडू नका. कुंभमेळ्याच्या नावाखाली नोकरभरतीचे खोटे दावे करुन नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या भामट्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील असा इशारा कुंभमेळा प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT