

Nashik Kumbh Mela 2027 latest news : सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने मंगळवारी (दि. २५) रोजी आयोजित केलेल्या बैठकीत सिंहस्थाच्या विविध कामांचे सविस्तर सादरीकरण नगरसेवकांसमोर केले जाणार होते.
मात्र, अधिकारी वेळेवर उपस्थितीत न राहिल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत सभागृहाचा त्याग केला. यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली.
त्यावर, स्थानिक लोकप्रतिनिधींना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा अनुभव असल्याने त्यांना विश्वासात घेऊनच आगामी सिंहस्थाचे नियोजन करण्यात येत आहे. नियोजनाबाबत लोकप्रतिनिधींची काही नाराजी असल्यास ती दूर करण्यात येईल अशी प्रतिक्रिया कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मंगळवारी बैठकीवरुन निर्माण झालेला गोंधळ व नाराजी दूर करण्यासाठी तसेच नगरसेवकांशी पुन्हा संवाद साधण्यासाठी येत्या ३ सप्टेंबरला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सिंहस्थांतर्गत सुरु असलेल्या विकासकामांचा सखोल आढावा सादर केला जाणार आहे.
सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक घेण्याची तयारी प्राधिकरण व मनपाने सुरू केली आहे. ही बैठक कालिदास कलामंदिर किंवा मनपाच्या सभागृहात घेण्याचे नियोजन आहे. मात्र, बैठक मनपाच्या अधिकृत सभागृहातच घ्यावी, असा तीव्र आग्रह मनपा पदाधिकाऱ्यांचा आहे.
मंगळवारी पंचवटी विभागातील भोरे नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता बैठकीचे आयोजन केले होते. सर्व १२२ नगरसेवकांना बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, या बैठकीला अधिकारीच विलंबाने पोहोचल्याने त्याठिकाणी उपस्थित असलेल्या बऱ्याच नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत तेथून निघून जाणे पसंत केले.
सायंकाळी ५.३० वाजता होणारी बैठक तब्बल दीड तास उशिराने सुरू झाली, त्यावेळी या बैठकीला अवघे १५ ते २० नगरसेवकच हजर होते. त्यामुळे आता सर्वच नगरसेवकांशी पुन्हा सुसंवाद साधण्यासाठी, तसेच त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा बैठक घेण्याची तयारी सुरू आहे.
सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केला. ते म्हणाले, नाशिकमध्ये दोन ते चार कुंभमेळ्यांचा अनुभव असलेले लोकप्रतिनिधी आहेत.
आगामी सिंहस्थाच्या तयारीसाठी त्यांची मदत घेतली जात आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या सूचनांचाही विचार केला जात आहे. मात्र, अंतिमतः शिखर समितीच्या मान्यतेनंतरच आवश्यक बदल करता येतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.