Girish Mahajan statement at Kumbh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : कुंभमेळ्याच्या कामांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल मंत्री महाजनांची दिलगिरी; नाशिककरांना दिला खास शब्द

Nashik Kumbh Mela updates : मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत. नाशिकमध्ये पुढील वर्षी (२०२७) कुंभमेळा असून त्यानिमित्ताने शहरात विविध विकासकामे सुरु आहेत.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिकमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा असून त्यानिमित्ताने शहरात विविध विकासकामे सुरु आहेत. त्यासाठी शहरभर खोदलेले रस्ते, वातावरणातील धुळीमुळे नाशिककरांना होणाऱ्या त्रासाबद्दल कुंभमेळा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. या कामांमुळे नाशिककरांना आणखी तीन ते चार महिने निश्चितपणे त्रास सहन करावा लागणार असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मात्र, कुंभमेळापूर्वी सर्व कामे पूर्ण करणार तसेच नाशिकला अव्वल शहर बनविणार असा शब्दही त्यांनी नाशिककरांना दिला आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी पोलिस कवायत मैदानावर मंत्री महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन सोहळा झाला. या सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाजन म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरवासीयांची गैरसोय होतेय, ही वस्तुस्थिती आहे. पण सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. भविष्यातील सुंदर स्वच्छ आणि हरित नाशिकच्या दृष्टीने चार महिने गैरसोय सहन करावी लागेल, असेही ते म्हणाले. भविष्यात नाशिक अतिशय सुंदर, स्वच्छ व हरित शहर होणार असून नाशिकला क्रंमाक एकचे शहर बनवायचे आहे, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.

शहरातील रस्ते, भूमिगत गटारी व गॅस पाइपलाइनसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. पुढील तीन-चार महिने हा त्रास होईल. पण मी आपल्याला निश्चितपणे सांगेल, की पुढील २५ वर्षे नाशिककरांना अशाप्रकारचा कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही. नाशिकमधील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जात आहेत. व्हॉइंट टॉपिंग केले जात आहेत. त्यामुळे खड्ड्यांच्या विषय नाशिकमधून कायमस्वरूपी संपणार आहे, असा दावा मंत्री महाजन यांनी केला.

तसेच सिंहस्थ कामांच्या दर्जाबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंकांविषयी महाजन यांनी सांगितलं की, आयआयटी, टाटा तसेच प्रशासन व्यवस्था अशा त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत सिंहस्थ कामांच्या दर्जावर लक्ष ठेवले जात आहे. या कामांमध्ये कुठे काही अनियमितता झाली असेल, तर त्याची माहिती घेतली जाईल, कामांच्या दर्जाविषयी तडजोड केली जाणार नाही. दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी

यंदा उन्हाळा अधिक तीव्र आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचला असून, हे तापमान ४९ अंशांपर्यंत जाण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळेच नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही मंत्री महाजन यांनी केले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये खाटा, औषधे, साहित्य तसेच कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती महाजन यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT