

Nashik BJP Politics : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे. त्यात नाशिक शहराची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांचा उजवा हात म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना देण्यात आली आहे. यातून मंगेश चव्हाण यांची नाशिक भाजप कारभारात आता अधिकृत एण्ट्री झाली असून यातून प्रत्यक्षपणे मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या राजकारणावरील पकड अधिक मजबूत होणार आहे.
नाशिक भाजपमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व दिसून येतं. नाशिकचे पालकमंत्री देखील ते राहिले आहेत. 2025 मध्ये त्यांची पुन्हा पालकमंत्री पदावर नियुक्ती करण्याचा प्रयत्न झाला, पण महायुतीतील वादामुळे तो निर्णय तात्पुरता स्थगित झाला. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कुंभमेळामंत्रीपदाची खास जबाबदारी सोपवण्यात आली. पालकमंत्रीपदाची निवड न झाल्याने त्यांनाच अघोषित पालकमंत्री संबोधले जाते.
कुंभमेळा विचारात घेऊन कोणत्याही परिस्थितीत नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता महाजन यांना हवी होती. त्यासाठी स्थानिक आमदारांचा विरोध डावलून महाजन यांनी मोठ्या प्रमाणात पक्षात इतर पक्षातील नेत्यांचे इनकमिंग घडवून आणलं. त्यावरुन भाजपला फटका बसेल असं बोललं गेलं तसेच मोठं रणकंदन झालं. मात्र, तरीही बहुमतासह ७२ जागा जिंकत पुन्हा पालिकेवर भाजपचीच एकहाती सत्ता आल्याने महाजन यांनी घेतलेले निर्णय योग्य होता असा संदेश गेला आणि पुन्हा सगळी सूत्र महाजनांकडेच आली.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाजनांची नाशिकमधील ढवळाढवळ स्थानिक मंत्र्यांना बोचत असतानाच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भातील पूर्व नियोजन बैठकांना नाशिकच्या आमदारांऐवजी महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले आमदार मंगेश चव्हाण हेच अनेकदा निमंत्रित असल्याने स्थानिक आमदारांमध्ये यातून अस्वस्थता निर्माण झाली असल्याच्या चर्चा तेव्हाच रंगल्या होत्या.
स्थानिक तीन आमदार असून त्यांना कुंभमेळा बैठकांचे अधिकृत आमंत्रण नसत, अशात दुसऱ्या जिल्ह्यातील मंगेश चव्हाण हे कोणत्या नात्याने बैठकांना उपस्थितीत राहत आहेत, नेमकं काय चाललं आहे? अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.
कारण जळगावच्या राजकारणात मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश महाजन म्हणजेच देवेंद्र फडणवीस असे समीकरण मानले जाते. म्हणजे मंगेश चव्हाण यांना दुसरे गिरीश महाजन म्हणूनच संबोधले जाते. आता तेच मंगेश चव्हाण नाशिकचे प्रभारी झाल्याने आता दुसऱ्या गिरीश महाजनांचीही अधिकृतपणे नाशिक भाजपच्या कारभारात व येथील राजकारणात एण्ट्री झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रभारी या नात्याने आमदार चव्हाण यांना बिनधास्तपणे व निसंकोचपणे नाशिकच्या राजकारणात वावरता येईल असे बोलले जात आहे.
भाजपमध्ये स्थानिक नेत्यांकडे कधीच प्रभारी पदाची जबाबदारी दिली जात नाही. ती अन्य जिल्ह्यातील नेत्याकडेच सोपवली जात असल्याचे सांगत आमदार चव्हाण यांची निवड सहज असल्याचे पक्षाचे काही ज्येष्ठ नेते वरवर सांगत असले, तरी देखील कुंभेमळा मंत्री जळगावचे, प्रभारी सुद्धा जळगावचे हे सगळं पाहाता भाजपमध्ये अंतर्गत नाराजीची भावना देखील व्यक्त करण्यात येत आहे. महाजनांचा येथील राजकारणात असलेला प्रभाव पाहाता कुणी उघडपणे बोलू शकत नसलं तरी अंतर्गत खदखद असून अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.