Gokul Gite, Anil Kadam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : निफाडचा एक सुपुत्र दबावाला बळी पडला, दुसरा संख्याबळापुढे हतबल ; येवल्याच्या दराडेंनी दुसऱ्यांदा मारली बाजी

Gokul Gite, Anil Kadam, Narendra Darade, : गोकुळ गिते व अनिल कदम दोघेही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे सुपुत्र आहेत. दोघांनाही नाशिक विधानपरिषद निवडणूक लढवण्याची संधी मिळाली पण, या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही.

Ganesh Sonawane

Nashik Politics : माजी आमदार अनिल कदम व पिंपळगाव बाजार समितीचे संचालक असलेले गोकुळ गिते दोघेही निफाड तालुक्यातील आहेत. कदम तालुक्यातील ओझरचे तर गिते शिंगवे गावचे सुपुत्र आहेत. दोघांनाही नाशिक विधानपरिषद निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती. त्यातून निफाडच्या पदरात दुसरी आमदारकी पडणार होती‌. मात्र दोघांनाही या संधीचं सोनं करता आलं नाही. याची खदखद आता निफाड तालुक्यातील नागरिकांना वाटल्याशिवाय राहणार नाही.

सध्या राष्ट्रवादीचे दिलीप बनकर हे निफाड तालुक्याचे आमदार आहेत. अशात विधानपरिषदेच्या निमित्ताने तालुक्याला दुसरा आमदार मिळण्याची मोठी संधी होती. अनिक कदम यांच्या किंवा गोकुळ गिते यांच्या रूपाने निफाडला दुसरा आमदार मिळणार अशी आशा निफाडकरांना लागली होती. त्यादृष्टीने निफाडच्या राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या होत्या.

महाविकास आघाडीत नाशिकची जागा उबाठा शिवसेनेला सुटली‌ होती. अनिल कदम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाशिक विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र अनिल कदम यांनी अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. संख्याबळ कमी असल्याने शिवसेना पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली. तिथेच निफाडकरांच्या आशा मावळल्या.

मात्र त्याचवेळी दुसरीकडे, गोकुळ गितेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निफाडकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. बंधू गणेश गिते यांनी माघार घेतली, मात्र गोकुळ गिते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्याची आक्रमक भूमिका पाहाता ते आता मागे हटणार नाही असेच वाटत होते.

महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पुढे गोकुळ गिते यांच्या रूपाने मोठं आव्हान उभं राहिलं. गोकुळ गिते यांचे बंड व आक्रमकपणा पाहाता दराडे समर्थकांना घाम फुटला. गोकुळ गितेंच्या उमेदवारीमुळे नको नको त्या शंका शिवसेनेच्या मनात घोंघावत होत्या. शिवसेनेला ही भाजपची रणनीती वाटत होती. तीन तीन मंत्र्यांच्या मनधरणीला गोकुळ गिते जुमानत नव्हते. महाजन-सामंत-भुसे यांच्या शिष्टाईला सातत्याने अपयश येत होतं. दराडेंना पराभव समोर दिसू लागला होता‌. गोकुळ गितेंमुळे महायुतीच्या मतदारांचे विभाजन होण्याची भिती निर्माण झाली होती‌.

अखेर राजकीय डावपेचात तरबेज असलेल्या दराडेंनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर अवलंबून न राहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावली. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सीएम फडणवीसांकडे पाठपुरावा सुरू ठेवला. गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांच्यावर म्हाडा प्रकरणात अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला. शेवटी आमदारकी की कौटुंबिक शांती या दोन पर्यायांपैकी गोकुळ गितेंना आपल्या भावासाठी कौटुंबिक शांतीचा पर्याय निवडावा लागला.

गोकुळ गिते यांचे बंड प्रचंड दबाव आणत थंड करण्यात आलं. आक्रमक गोकुळ गितेंना आपल्या भावासाठी तलवार म्यान करावी लागली. अन् नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. निफाडकरांची आमदारकी हुकली. नरेंद्र दराडेंच्या रूपाने येवला तालुक्याला चौथा आमदार मिळण्याचा मार्गही मोकळा झाला. गेल्यावेळी या जागेवर दराडेच आमदार होते, आता दुसऱ्यांदा पुन्हा आमदार होण्यासाठी ते सज्ज आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT