Nashik Constituency sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Constituency : नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत ; सिन्नरमध्ये मतदारांचा मोठा प्रतिसाद!

Waje Vs Godse News : महायुतीचे खासदार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात मुख्य लढत होती.

Sampat Devgire

Loksabha Election News : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात मुख्य लढत होती. आज मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चुरस दिसून आली. या निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्रांवर अक्षरशा उत्सव साजरा केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच पर्यंत 51.61 टक्के मतदान झाले. आज झालेल्या मतदानात महायुतीकडून शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडी तर्फे ठाकरे गट या शिवसेनेच्या दोन्ही प्रमुख गटांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. दोन्ही बाजूंनी अस्तित्वाची लढाई म्हणून कार्यकर्ते आणि नेते मैदानात उतरले होते. त्यात महायुतीचे काही घटक कुंपणावर बसून असल्याचेही दिसले. त्यामुळे मतदानानंतर मतमोजणीचा निकाल काय लागतो? हा उत्सुकतेचा विषय आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली होती. वाजे हे सिन्नरचे आहेत. त्यामुळे सिन्नरच्या मतदारांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. सिन्नरच्या सर्व मतदारसंघांवर वाजेंना अनुकुल वातावरण दिसून आले. सकाळपासून मतदानासाठी रांगा होत्या. दुपारचा विसावा झाला. त्यानंतर कामावर गेलेले शेतमजूर, शेतकरी आणि मतदार सर्वच मतदान केंद्रावर जमले. या गर्दीतून अक्षरशः मतदानाचा उत्सव साजरा झाला. त्यामुळे नाशिक मतदारसंघाची निवडणूक सिन्नरने एक हाती आपल्याकडे घेतल्याचे दिसून आले.

आज झालेल्या मतदानातून नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या दोन मतदारसंघात अतिशय तणावपूर्ण स्थिती होती. मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. सायंकाळी मतदानाची वेळ संपली तेव्हाही प्रचंड गर्दी असल्याने शेकडो मतदारांना आपला मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले.

या दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. काही तक्रारी निवडणूक पर्यवेक्षक आणि पोलिसांकडेही झाल्या. त्यामुळे दिवसभर कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांचा पाठलाग आणि चुरस अशी स्थिती होती. मध्य मतदारसंघात भद्रकाली मार्केट येथे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांच्यात हमरीतूमरी झाली. माजी महापौर विनायक पांडे यांनी त्यात मध्यस्थी केली. पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला.

अशीच स्थिती उपनगर पोलीस ठाण्याच्या आवारातही घडली. येथे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी पैसे वाटण्याचा संशय असलेल्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की केली. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या चार कार्यकर्त्यांना संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सिडकोमध्ये जनता विद्यालयात खासदार गोडसे(Hemant Godse) आणि वाजे यांच्या समर्थकांत मोठा वाद झाला. इंदिरानगर येथे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीकडून आपल्या कार्यालयात पैसे वाटले जात आहेत, अशी तक्रार करण्यात आली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार केल्याने येथे मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी कार्यालयाची तपासणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर हे प्रकरण निवळले. भालेकर शाळेत मतदानाची वेळ संपली तेव्हा शेकडो मतदार गेट बाहेरच राहिले. लोखंडे मळा येथेही असाच गैरप्रकार घडल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आजच्या मतदानात दुपारनंतर अतिशय चुरस दिसून आली.

नाशिक मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे या दोन गटांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. अन्य सर्व पक्ष काठावर बसून या चुरशीचा आनंद घेत होते. त्यामुळे राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडखोरीनंतरची स्थिती येथे पाहायला मिळाली. यामध्ये ठाकरे गटाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी घेतल्याचे दिसून आले.

सायंकाळी पाच पर्यंत झालेल्या मतदानात, सिन्नर 58.70 टक्के, नाशिक पूर्व 49.23 टक्के, नाशिक मध्य 51.01 टक्के, नाशिक पश्चिम 45.08 टक्के, देवळाली 49.80 टक्के आणि इगतपुरी 57.11 टक्के असे एकूण 51.61 टक्के मतदान झाले. यामध्ये सुमारे सहा ते सात टक्के मतदान वाढण्याची शक्यता निवडणूक शाखा प्रशासनाने व्यक्त केली. आजच्या मतदानात दिसलेला उत्साह आणि मतदानाचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता कोण विजयी होतो आणि कोण कोणावर मात करतो याची उत्सुकता वाढली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT