Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Chhagan Bhujbal, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचा सर्व्हे म्हणतो, बरं झालं भुजबळ बाहेर पडले; शरद पवारांचा उमेदवारही ठरला?

संपत देवगिरे

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याचा निश्चय केला आहे. या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बारामती येथे बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे जागावाटपाचे आडाखे बांधण्याचे काम पक्षीय स्तरावर जोरात सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत राज्यातील आघाडीच्या नेत्यांची प्राथमिक बैठक होणार आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गेल्या महिन्यात चांदवड येथे कांदा निर्यात बंदी विरोधातील आंदोलनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी लोकसभा निवडणुकीविषयी (Lok Sabha Election) चर्चा केली होती. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात राजकीय सर्व्हे करण्याचे ठरले होते. या सर्वेचे निष्कर्ष नुकतेच हाती आले. त्यावर बारामती (Baramati) येथे पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली.

पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व्हेच्या निष्कर्षाचा आधार घेत नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचा दावा केला. या दाव्यामुळे राज्याच्या जागा वाटपात नाशिकची जागा घ्यावी, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी केला. संभाव्य उमेदवार म्हणून गोकुळ पिंगळे यांनी उमेदवारी करण्याची तयारी दर्शविली आहे. या चर्चेच्या वेळी शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यातील 11 हजार सामाजिक राजकीय आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क करून सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शरद पवार यांच्या विषयी मतदारांमध्ये सहानुभूती कायम आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरापेक्षा शेतीचे प्रश्न आणि बेरोजगारी याला मतदारांनी अधिक महत्त्व दिल्याचे आढळले.

अजित पवार यांनी महायुतीत जाऊन चूक केली आहे, असे बहुतांशी नागरिकांनी सांगितले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्याने बहुतांशी लोकांनी त्याचा शरद पवार गटाला फायदाच होईल, असा निष्कर्ष या सर्व्हेमध्ये आढळल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT