Eknath Shinde, Hemant Godse, Chandrashekhar Bawankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Loksabha News : नाशिकमध्ये युती अन् आघाडीला मोठा धक्का ; 'या' महाराजांची अचानक राजकारणात एन्ट्री

Arvind Jadhav

Nashik News : ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ असे ब्रीदवाक्य घेऊन जयबाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख आणि वेरूळ मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी सोमवारी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट केले. रामराज्य स्थापन करण्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असल्याचे स्पष्ट करत एकप्रकारे हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) निवडणुकीत प्रथमच एखाद्या गटाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला असून, महाराजांच्या अचानक एंट्रीमुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. ‘आतापर्यंत लोकांसाठी आता फक्त बाबांसाठी’ अशी घोषणा भक्त परिवाराकडून देण्यात आली. शांतीगिरी महाराजांचा छत्रपती संभाजीनगरसह नाशिकमध्ये मोठा भक्त परिवार आहे.

नुकतेच महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथे धार्मिक अनुष्ठान पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने भक्त परिवार उपस्थित होता. नाशिक जिल्ह्यात बाबांचा भक्त परिवार असल्याने तसेच त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील असल्याने त्यांचा सतत संपर्क असतो.

वेरूळ येथील मठाचे मठाधिपती असलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) 2009 ची लोकसभा निवडणूक चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात लढवली होती. महाराजांना विजय मिळाला नाही. मात्र, जवळपास एक लाख 48 हजार मते त्यांना मिळाली होती. यानंतर शांतीगिरीजी महाराज सक्रीय राजकारणापासून काहीसे दूर राहिले.

यंदाची लोकसभा निवडणूक ते छत्रपती संभाजीनगर येथून लढवतील असा अंदाज बांधला जात असताना आज अचानक जय बाबाजी भक्त परिवारातील भक्तांनी प्रेस घेऊन महाराज नाशिक लोकसभा लढवतील, असे जाहीर केले. यानंतर महाराजांचा एक व्हिडीओही समोर आला. त्यात त्यांनी भक्तांच्या आग्रहाखातर ही निवडणूक लढवण्याचे घोषित केले. माझ्यापुढे सात लोकसभा मतदारसंघांचा पर्याय होता. मात्र,नाशिकमधील भक्त परिवाराचा जोर पाहता मी नाशिकला पसंती दिल्याचे महाराजांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट नाही.या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) करतात. त्यांचा या मतदारसंघावर दावा असून,भाजपाचेही प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांमध्येही तशीच परिस्थिती आहे.शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी तर प्रत्यक्षात प्रचार सुरू केला असून,ते सतत मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात मग्न आहेत.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) याच जागेसाठी आग्रही आहेत. यावर अद्याप तोडगा निघालेला नसताना नाशिक लोकसभेसाठी अधिकृतपणे पहिल्या उमेदवारांची घोषणा झाली.महाराजांच्या या अचानक एंट्रीचा कोणत्या पक्षाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT