Nagar News : अपत्य प्राप्ती संदर्भात विधान करून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (पीसी-पीएनडीटी) कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी निवृत्ती देशमुख महाराज ऊर्फ इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात संगमनेर न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याच्या आजच्या ८ नोव्हेंबरच्या तारखेला इंदुरीकर महाराज पुन्हा गैरहजर राहिले. परंतु इंदुरीकर महाराज यांनी जामिनासाठी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज सादर केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इंदुरीकर महाराज यांच्या या अर्जावर तक्रारदार अंनिसच्या वकील रंजना गवांदे यांनी न्यायालयात हरकत अर्ज सादर केला. कायद्यासमोर सर्व समान आहेत, गैरतक्रारदार हजर होत नसतील, तर अटक वॉरंट काढा. यावर न्यायालयाने पुढची सुनावणी २१ नोव्हेंबरला ठेवली आहे.
अपत्य प्राप्तीसंदर्भात अडीच वर्षापूर्वी इंदुरीकर महाराज यांनी विधान केले होते. यासंदर्भात अंनिसच्या कार्यकर्त्या रंजना गवांदे यांच्या खासगी तक्रारीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला. आता संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला सुरू आहे. गेल्या १३ ऑक्टोबरला खटल्याच्या सुनावणीला इंदुरीकर महाराज गैरहजर राहिले होते.
समन्स बजावण्यासाठी गेलेल्या संगमनेर पोलिसांनी इंदुरीकर महाराज मिळत नसल्याचा अहवाल न्यायालयासमोर दिला होता. यावर तक्रारदार 'अंनिस'च्या वकील रंजना गवांदे यांनी न्यायालयात अर्ज करत इंदुरीकर महाराज यांना उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत समन्स बजावण्यात यावे, अशी विनंती केली.
न्यायालयाने अर्जाची दखल घेत उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावण्याचा आदेश दिला. त्यानंतर न्यायालयाने पुढची सुनावणी ८ नोव्हेंबरला म्हणजेच आज ठेवली होती. आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावण्यात आले. इंदुरीकर महाराज न्यायालयात हजर होण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु इंदुरीकर महाराज न्यायालयात अनुपस्थित राहून त्यांनी वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज सादर केला. इंदुरीकर महाराज यांच्या पुढच्या सहा महिन्यांच्या तारखा 'बुक' असतात. त्यामुळे ते न्यायालयात येवू शकत नाही. तसेच सरकार पक्षातर्फे सरकारी वकील खटला लढत असताना यात तक्रारदारांनी हस्तक्षेप करता येत नाही, असा युक्तिवाद इंदुरीकर महाराज यांच्या वकिलांनी केला.
यावर तक्रारदार रंजना गवांदे यांनी न्यायालयासमोर हरकत अर्ज सादर केला. गैरतक्रारदाराला (इंदुरीकर महाराज) न्यायालयाने समन्स काढले आहे. तरी देखील ते हजर होत नाहीत. यावर अटक वॉरंट काढा. हस्तक्षेपाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयानेच तक्रारदाराचे नाव समाविष्ट केले आहे. त्यामुळे हा मुद्दा युक्तिवादाचा ठरूच शकत नाही. इंदुरीकर महाराजांच्या पुढच्या सहा महिन्याच्या तारखा बुकिंगच्या मुद्यावर गवांदे यांनी कायद्यासमोर सर्व एकसमान आहेत, असे सांगितले. न्यायालयात आता या खटल्याची सुनावणी २१ नोव्हेंबरला होईल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.