Nagpur Firing : आरटीओ प्रकरणात खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

Financial Dispute : आलीशान हॉटेलमध्ये पैशांची हिस्सेवाटणी करताना दिसले अधिकारी
RTO Bribe Case Nagpur
RTO Bribe Case NagpurSarkarnama
Published on
Updated on

Geeta Sejwal & Sanket Gaikwad Case : भरारी पथकांनी केलेल्या पैशांच्या वसुलीचा हिशोब न जुळल्याने आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ आणि संकेत गायकवाड यांच्यातील गोळीबाराचे प्रकरण दिवसेंदिवस धक्कादायक वळणांवर येत आहे. गोळीबाराच्या या प्रकरणामुळे नागपुरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

वसुलीच्या ज्या पैशांमुळे गीता शेजवळ यांनी संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. तशाच वसुलीच्या पैशांची हिस्सेवाटणी करताना काही अधिकाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहे. नागपुरातील शंकरनगरात असलेल्या एका आलीशान हॉटेलमध्ये बसून ही हिस्सेवाटणी सुरू असल्याचे आणि त्यावेळी एक वरिष्ठ अधिकारी तेथे असल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे.

RTO Bribe Case Nagpur
Nagpur Firing : वसुलीच्या कारणावरूनच संकेत गायकवाड यांच्यावर झाडली गोळी

सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन केल्यानंतर आता नागपूर पोलिस याप्रकरणात लाचेच्या कलमाचा समावेश करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरटीओ पथकांच्या प्रमुख म्हणून आधी गीता शेजवळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे पथकांच्या वसुलीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शेजवळ यांच्यानंतर हे काम संकेत गायकवाड यांना देण्यात आले होते.

वसुलीतून मिळालेल्या रकमेचा हिशोब न जुळल्यामुळे आरटीओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शेजवळ व गायकवाड यांना हा हिशोब जुळविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोघेही हिशोब जुळवत असताना त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने शेजवळ यांनी शासकीय बंदुकीतून गायकवाड यांच्यावर गोळी झाडली. गोळी गायकवाड यांच्या दोन्ही मांड्यांमधून गेली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोळीबारांनतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना फोन करण्यात आला. चव्हाण यांची पत्नी डॉ. ज्योती चव्हाण यांच्या मदतीने संकेत यांना धंतोलीतील एका दवाखान्यात दाखल केले. या दवाखान्यात गायकवाड यांच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी चव्हाण दाम्पत्याचीही पोलिसांनी सहा तास चौकशी केली. विजय चव्हाण यांच्याविरुद्ध यापूर्वी शासनाची दिशाभूल करीत लाभाचे पद घेतल्याचा ठपका होता. त्यांचे नाव गोळीबार प्रकरणात आल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.

संकेत गायकवाड गोळीबार प्रकरणात आता पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागल्याने नागपूर आरटीओमधील मोठा घोळ उघडकीस येण्याची शक्यता आहे. गीता शेजवळ यांच्याविरोधात पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा तर संकेत गायकवाड यांच्या विरोधात पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. शेजवळ यांना नागपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना ‘अंतरिम’ मंजूर करीत दिलासा दिला आहे.

RTO Bribe Case Nagpur
Nagpur Firing : गोळीबार प्रकरणात गडचिरोली डेप्युटी आरटीओंची सहा तास चौकशी

गृहमंत्र्यांच्या शहरात हे चाललेय काय?

नागपूर भाजपचे दिग्गज नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर. फडणवीस हेच नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. अशात त्यांच्या गृहजिल्ह्यात उघडकीस आलेल्या या प्रकारानंतर कारवाईबाबत शासनाने धारण केलेले मौन आश्चर्यकारक आहे. एकापाठोपाठ गुन्हे, फसवणुकीच्या मालिकांचा ठपका असलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबन आणि विभागीय चौकशीबाबत शासनस्तरावर लागत असलेल्या अनाकलनीय विलंबामुळे नागपुरातील या प्रकरणाची पाळेमुळे मुंबईत कुठपर्यंत पोहोचलेली आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

RTO Bribe Case Nagpur
Nagpur Firing : आर्थिक व्यवहाराच्या वादातून आरटीओ अधिकाऱ्यांमधील फायरिंगची घटना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com