MHADA housing scam investigation in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MHADA Fraud : पोलिसांकडून घरात घुसून धरपकड सुरु, नाशिकमध्ये बड्या बिल्डरांचे धाबे दणाणले

Nashik Builder Arrest: शहरातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

Ganesh Sonawane

Nashik News: नाशिकमध्ये म्हाडा घरांच्या कोट्याबाबत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. महापालिका क्षेत्रातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये म्हाडा सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव क्षेत्र ठेवण्याचा नियम धाब्यावर बसवून म्हाडा, महसूल आणि भूमि अभिलेख विभागाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या १९४ बिल्डरांचे धाबे आता दणाणले आहेत. कारण पोलिसांकडून याप्रकरणी बिल्डरांची धरपकड सुरु झाली आहे.

रविवारी (ता. १५) रात्री उशिरा आठ ते दहा जणांना पोलिसांनी जबाबासाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. व्यावसायिकांवर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने बहुतांशी व्यावसायिकांनी अटकपूर्व जामीनाकरिता धावपळ सुरु केल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातल्याने संबधित बांधकाम व्यावसायिकांमध्ये आता कारवाईची अधिक भीती आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचारीही अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार म्हाडा सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक एकर किंवा चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या गृहप्रकल्पांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी किमान २० टक्के क्षेत्र राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र शहरात २०१३ ते २०२४ या कालावधीत उभारण्यात आलेल्या ४९ गृहप्रकल्पांमध्ये हा नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे.

शहरातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये तुकडेबंदी कायद्याच्या आधारावर बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यासंदर्भात भूमिअभिलेख कार्यालयाने सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण अधिक उजेडात आले आहे.

नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याने सरकारवाडा पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र संशयितांनी नोटिसांना जुमानले नाही. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अॅक्शन मोडवर येत थेट या संशयित व्यावसायिकांच्या घरावर छापे टाकण्याचे आदेश दिले. रविवारी (ता. १५) रात्री शहर पोलिसांच्या पथकांनी गुन्हे दाखल असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर छापे टाकले. यात आठ ते दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत अटकेची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान ताब्यात घेतलेल्या बिल्डरांची नावे मात्र समजू शकलेली नाहीत. पोलिसांच्या या कारवाईने शहरातील बांधकाम व्यावसायिकांचे धाबे मात्र दणाणले आहे. गुन्हा दाखल असलेल्या १९४ जणांमध्ये काही शेतकऱ्यांचाही समावेश आहे. संशयितांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत सह्या घेतल्याचे तपासातून समोर येते आहे.

साधारणपणे एक लाख ९३ हजार ३८४ चौरस मीटरचे हे क्षेत्र असून, त्यातून अंदाजे १५० कोटींचा प्राथमिक घोटाळा असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांवर परवडणाऱ्या दरात घरांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT