Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषदेची जागा महायुतीमध्ये कुणाला द्यायची यावरुन शिवसेना व भाजप यांच्यात मोठी रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने भाजपला ही जागा हवी आहे. तर, मागच्या वेळी शिवसेनेचा आमदार होता त्यामुळे शिवसेनेला ही जागा हवी आहे.
दरम्यान नाशिक आणि जळगावच्या जागेत अदलाबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगावची भाजपची जागा शिवसेनेला दिली जाऊ शकते. तिथे शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील व आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे
तसेच नाशिकची शिवसेनेकडील जागा भाजपला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेकडून नाशिकची जागा भाजपला सुटावी यासाठी पक्षाचे इच्छुक असलेले उमेदवार गणेश गिते, नीलेश बोरा मुंबईत ठाण मांडून होते. भाजपने यावेळी नाशिकच्या जागेवर ठाम दावा सांगितला आहे.
त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीत ही जागा भाजपला सुटल्यास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. इच्छुक उमेदवार गणेश गिते आणि नीलेश बोरा हे दोघेही महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे उमेदवारीसाठी दोघेही इच्छुक असल्याने नाशिकची जागा सुटलीच तर महाजन कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे इच्छुकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे जळगावची जागा भाजपलाच सुटावी यासाठी तेथील पदाधिकारीही मुंबईत ठाण मांडून असल्याने पक्षांतर्गत अदलाबदलीस विरोध होत आहे. त्यामुळे नाशिक व जळगाव दोन्ही जागांचा तिढा आजून सुटलेले नाही. अशात नाशिकमध्ये भाजप व शिवसेनेत मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. अशापरिस्थितीत भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेला शह देण्यासाठी धक्कातंत्राचे अवलंब करत एखाद्या वेगवळ्याच नावाला पसंती देऊ शकते. ऐनवेळी या उमेदवाराचा भाजपमध्ये पक्षप्रवेश घडवून आणला जावू शकतो.
भाजपकडे सर्वाधिक मतदार
उपलब्ध आकडेवारीनुसार नाशिक विधानपरिषदेच्या जागेसाठी ६१९ सदस्य मतदान करणार आहेत. यात महायुती महायुतीकडे ४६६ सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यात भाजपकडे सर्वाधिक १८८, शिवसेनेकडे १७१ तर राष्ट्रवादीकडे १०७ सदस्य आहेत. सर्वांधिक मतदारसंख्या भाजपकडे असल्याने ही जागा भाजपला हवी आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडे तुलनेने कमी संख्याबळ आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ४५, काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. याशिवाय इस्लाम पार्टीचे ३५, 'एमआयएम'चे २१, तर अपक्ष व इतर ४१ सदस्य आहेत. संख्याबळाच्या जोरावर ही जागा महायुतीला सहज मिळेल, असे चित्र असले तरी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अद्याप स्पष्टता नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.