Gokul Gite Narendra Darade Nashik MLC Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : शेवटी गेम झालाच, अदृश्य शक्ती गोकुळ गीते यांच्यासोबत, नरेंद्र दराडे यांची दमछाक अटळ!

Nashik MLC Election : सहा उमेदवारांची माघार, भाजप बंडखोर गोकुळ गीते विरुद्ध महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यात लढत निश्चित झाली आहे. तर महाजन व फडणवीसांच्या शिष्टाईनंतर गणेश गितेंची माघार.

संपत देवगिरे : सरकारनामा

Nashik MLC Election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईमुळे बंडखोर गणेश गीते यांनी माघार घेतली. मात्र त्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला त्यांनी शेवटपर्यंत झुंजवले. शेवटी माघारी नंतरही नरेंद्र दराडे यांचा जीव टांगणीला लागला आहे.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत आज माघारीचा शेवटचा दिवस होता. यावेळी नऊ पैकी सहा उमेदवारांनी माघार घेतली. या सर्व राजकारणात महायुतीला बंडखोरीचे आव्हान कायम राहिले.

विधान परिषदेच्या मतपत्रिकेवर आता भाजपचे प्रसाद हिरे, भाजपच्या अदृश्य शक्तींचा आशीर्वाद लाभलेले गोकुळ गीते आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नरेंद्र दराडे हे तीन उमेदवार असतील. यात हिरे यांची उमेदवारी तांत्रिक कारणामुळे राहिली. त्यामुळे महायुतीचे दराडे विरुद्ध बंडखोर गीते अशी लढत अटळ आहे.

आज सकाळी भाजप बंडखोर गणेश गीते यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री महाजन यांच्या आदेशामुळे माघार घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र नाशिकचा थेट संबंध जळगाव निवडणुकीशी होता. त्यामुळे जळगावहून फोन येईपर्यंत गणेश गीते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतीक्षा करीत होते. जळगावच्या फोन नंतरच त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गोरख बोडके, विष्णुपंत म्हैसधुणे, आमदार दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे, मालेगावच्या इस्लाम पार्टीचे मोहम्मद खालील अब्दुल रशीद, परवेज कोकणी या प्रमुख उमेदवारांसह सहा जणांनी आज माघार घेतली. या सर्व घडामोडींमध्ये गोकुळ गीते हे मात्र दिवसभर नॉटरीचेबल होते. त्यांनी आज सकाळीच दराडे यांना आव्हान देणार असल्याचे जाहीर केले होते.

माघारीची मुदत संपल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नरेंद्र दराडे यांच्या पुढे गीते यांचे प्रबळ आव्हान कायम आहे. गीते यांना अदृश्य शक्तींचा पाठिंबा आहे हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटपर्यंत भाजप नेत्यांची विनवणी करावी लागणार आहे. संकट मोचक गिरीश महाजन यांचे या निवडणुकीतील महत्त्व मतदान होईपर्यंत कायम राहील. त्यामुळे नरेंद्र दराडे यांच्यासाठी ही निवडणूक आता सोपी नाही. यानिमित्ताने दराडे यांच्यावर महायुतीतूनच गंभीर आरोप होऊ लागले आहेत. या आरोपांचा सामना दराडे यांना करावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT