

MLC Election : नाशिक व जळगाव विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरांना थोपवण्यासाठी दोन दिवस संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी जीवाचे रान केले. पण महाजनांना त्यात अपयश आलं. नाशिक व जळगाव विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरांनी माघार न घेता उमेदवारी कायम ठेवल्याने गिरीश महाजनांचे दोन्ही ठिकाणी बंडखोरांना थोपवण्याचे व निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्यामुळे आता दोन्ही ठिकाणी निवडणूक लागली आहे.
महायुतीच्या जागावाटपात नाशिक विधानपरिषदेची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली. माजी आमदार नरेंद्र दराडे यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. पंरतु मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय व भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने नरेंद्र दराडे यांच्यापुढे गितेंचे आव्हान उभे राहिले आहे. याशिवाय भाजपच्या प्रसाद हिरे यांनीही आपला उमेदवारी मागे न घेता कायम ठेवला.
गणेश गिते यांचे बंड शमवण्यात मंत्री महाजन यांना यश आलं. गणेश गिते यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. परंतु त्यांचे बंधू गोकूळ गिते यांचे बंड शमवण्यात संकटमोचक महाजनांना अपयश आलं. गिते बंधूंना रोखण्यासाठी महाजनांनी बरेच प्रयत्न केले. मुंबईत त्यासाठी दोन दिवस मोठ्या घडामोडी घडल्या. आजही मंत्री महाजन यांनी गोकुळ गिते यांना फोनवर फोन करत माघार घेण्यासाठी विनंती केली. बंधू गणेश गिते यांच्यासह कार्यकर्त्यांनीही फोनवर गोकुळ गिते यांना माघार घेण्यासाठी मनधरणी केली. पण अर्ज माघारी घेण्याची मुदत संपूनही गोकूळ गिते जिल्हाधिकारी कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे महायुतीचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष गोकुळ गिते, प्रसाद हिरे अशी लढत नाशिकमध्ये होणार आहे.
रेश्मा काळेंची माघार नाहीच
तर, जळगाव विधानपरिषद निवडणुकीत मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे नंदकिशोर महाजन यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद तायडे रिंगणात आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महायुतीमध्ये मतांचे विभाजन होण्याची भिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या तीन बंडखोरांना रोखण्यात महाजनांना यश आलं. पण शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांचे बंड महाजन रोखू शकले नाही. खरे तर कोणाचीही बंडखोरी कायम राहणार नाही, आम्ही सगळ्यांची समजूत काढू असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला होता. पण शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी आपला निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला. माघारीच्या अंतिम दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या माघारीचे प्रयत्न करण्यात आले. पण त्या नॉटरिचेबल होत्या.
शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी अर्ज कायम ठेवल्याने महायुतीच्या गोटात चिंता कायम राहिली आहे. त्या शिवसेनेच्या असल्याने त्यांच्या उमेदवारीचा थेट परिणाम महायुतीच्या मतांवर होण्याची शक्यता आहे. याशिवाय भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू प्रहार संघटनेचे अनिल चौधरी यांनीही आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. महायुतीच्या मतांमध्ये फूट पडू नये म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी भरीच धावपळ केली. नाराज इच्छुकांची मनधरनी करण्याचे प्रयत्न केले. बंडखोरांना थोपवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी अनिल चौधरी व रेश्मा काळे यांचे उमेदवारी कायम राहिल्याने आता महायुतीच्या अधिकृत उमेदवारापुढे मतांची एकजूट राखणे मोठे आव्हान बनले आहे.
नाशिक -जळगावचे अंतिम चित्र
नाशिक - नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध गोकुळ गिते (बंडखोर, भाजप) विरुद्ध प्रसाद हिरे (बंडखोर, भाजप) ( नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र त्यांनी अर्जच दाखल केला नाही.) मविआने नाशिकमधून माघार घेतली.
जळगाव - नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध रेश्मा काळे (शिवसेना, शिंदे गट) बंडखोर विरुद्ध अनिल चौधरी (प्रहार संघटना)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.