Nashik MLC Election | Gokul Gite | Narendra Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election : नाशिक विधानपरिषदेत महायुतीचे नेते लढायचं सोडून माघारीच्याच मागे का लागले, एका अपक्ष उमेदवाराची एवढी धास्ती का?

Nashik MLC Election Gokul Gite : मुळात आता उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ नाही. पण गोकुळ गिते यांना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा व निवडणूक लढवू नये यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे.

Ganesh Sonawane

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषदेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिकची जागा शिवसेनेच्या(शिंदे गट) वाट्याला गेली आहे. नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असले तरी भाजपचे गोकुळ गिते यांनी तिथे बंडखोरी केल्याने नरेंद्र दराडे यांचा मार्ग खडतर बनला आहे. गोकुळ गिते यांचे बंड थोपवण्यात महायुतीच्या मंत्र्यांना सातत्याने अपयश येत आहे.

नाशिकमध्ये महायुतीला मोठे बहुमत आहे. पुरेसे संख्याबळ असतानाही महायुतीचे तीन-तीन मंत्री एका अपक्ष उमेदवाराची मनधरणी करण्यासाठी खेटा घालत आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना आपल्या मतदारांवर विश्वास नाही का? एका अपक्ष उमेदवाराची एवढी धास्ती का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी भाजपचे संकटमोचक असणारे मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्यासह महायुतीला पुरते जेरिस आणले आहे. तीन्ही मंत्र्यांकडून गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा यासाठी विणवणी केली जात आहे. प्रसाद हिरे यांनी माघार घेतल्यानंतर आता गोकुळ गिते यांच्या माघारीसाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान आज नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हेही गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांच्या घरी जाऊन आले. पण आपण दीपाली गिते यांच्याकडे मतदान मागायला गेलो असल्याचे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. मात्र, यातून एकप्रकारे गोकुळ गिते यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकला जात आहे. लढायचं सोडून अर्थात निवडणुकीला सामोरे जायचं सोडून, महायुतीच्या नेत्यांचा मॅनेजमेंट करण्यातच जोर दिसू लागल्याने नेमकी यांना कसली भीती आहे, याची चर्चा आता जिल्ह्यात सुरु झाली आहे.

एकुण ६१९ मतदार आहेत. त्यात भाजपकडे १८८ मतदान आहे. शिवसेनेकडे १७१ व राष्ट्रवादीकडे १०७ असे एकुण मतदानापैकी ४६६ कितके मतदान महायुतीकडे आहे. निवडुन यायला केवळ ३१० मतदान हवे. मग तरी अपक्ष गोकुळ गिते यांच्या पाठिंब्याची महायुतीच्या उमेदवाराला एवढी गरज का भासते आहे हा संशोधनाचा विषय आहे.

दुसरीकडे गीतेंच्या उमेदवारीवरून महाजन यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. गोकुळ गिते यांच्या उमेदवारीमागे भाजपची रणनिती आहे का? याची भिती शिवसेना नेत्यांना वाटू लागल्याचे बोलले जात आहे. मुळात या निवडणुकीत व्हीप लागू होत नाही. मतदारांना मतदान दाखवावे लागत नाही. अशात क्रॉस व्होटिंगची भिती तर नाही? असे अनेक प्रश्न उपस्थितीत केले जाऊ लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT