Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला. प्रचार थांबवल्याची घोषणा केलेल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी मैदान मारले होते. बहुमत असूनही महायुतीचा उमेदवार पडला, एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत आली.
निवडणूक निकालानंतर कथित आर्थिक व्यवहार आणि मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता. निवडणूक निकालाच्या दिवशीच त्यासंदर्भात आरोप-प्रत्यारोप झाले. निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेत कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत जिल्हा प्रशासनाला चौकशीचे निर्देश देत अहवाल मागितला आहे.
बंधू नरेंद्र दराडे यांचा पराभव झाल्यानंतर आमदार किशोर दराडे यांनी कथितरित्या पैसे दिल्याचा माध्यमांसमोर काही ठिकाणी उल्लेख केला होता. महायुतीत आमचा विश्वासघात झाला, आमचेच पैसे घेऊन मतदारांना वाटल्याचं किशोर दराडे म्हणाले होते. त्यानंतर कोपरगावचे संजय काळे यांनी थेट निवडणूक आयोगाकडे २४ जूनला तक्रार केली होती. त्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत नाशिक जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने संबधित व्यक्तींना नोटीस बजावून खुलासा मागविल्याचे वृत्त आहे.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत नेमके पैसे कुणाला दिले आणि किती दिले या संदर्भात चौकशी होण्याची शक्यता आहे. संबंधित यंत्रणेला याविषयीचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. त्याअनुषंगाने चौकशी होऊ शकते. तक्रारदार संजय काळे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या या चौकशीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.