Nashik MLC election political controversy: विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीकडे ४६६ मतांचे स्पष्ट बहुमत असतानाही महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव झाला.
महायुतीची तब्बल २१८ मते फुटल्याने नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला असून घरात केवळ एक मत असलेल्या अपक्ष गोकुळ गिते यांचा विजय झाला. त्यांना तब्बल ३५७ मते मिळाली. १०९ मतांनी त्यांनी दराडेंचा पराभव केला.
फुटीर २१८ मतांपैकी सर्वाधिक मते भाजपची असल्याचे बोलले जात आहे. या धक्कादायक निकालानंतर पराभूत नरेंद्र दराडे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना या पराभवासाठी जबाबदार धरलं आहे. महाजन यांनी गोकुळ गिते यांना ताकद दिल्याचा आरोप त्यांनी केला. दराडे यांच्या पराभवाची भाजपने गंभीर दखल घेतली असून बंडखोरीची चौकशी सुरू केली आहे.
भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी हे बुधवारी नाशिकमध्ये आले होते. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शहराध्यक्ष सुनिल केदार आणि गटनेते ॲड. शाम बडोदे यांना शहरातील मतफुटीचा अहवाल, तर जिल्हाध्यक्षांना ग्रामीण भागाचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
नगरसेवकांशी चर्चा करुन तयार झालेला विधान परिषदेच्या मतफुटीचा चौकशी अहवाल जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, गटनेत्यांकडून मागविला आहे. हा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला जाणार असल्याचं भाजप संयोजक विजय चौधरी यांनी सांगितलं आहे.
नरेंद्र दराडे हे शिवसेनेचे असले तरी ते महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. त्यांच्या विजयासाठी भाजपने देखील आपल्या नगरसेकांना व्हिप बजावला होता. भाजपच्या नगरसेवकांना दराडे यांना मतदान करण्याचा व्हीप बजावण्यात आला होता. पक्षाच्या घटनेनुसार व्हीप न पाळणाऱ्यांवर कलम २५ अन्वये कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
आता चौकशीत व्हीप न पाळणाऱ्या नगरसेवकांची नावे समोर आल्यास त्यांच्यावर संघटनात्मक आणि पालिकेतील पदांवरून कारवाई होणार आहे. स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, स्थायी समिती सदस्य अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांना पाणी सोडावे लागेल अशी माहिती पक्षांतर्गत सूत्रांकडून मिळाली आहे.
नाशिकमध्ये निवडणुकीत एकुण ६१९ मतदार होते. त्यातील ४६६ मते महायुतीच्या तीन्ही पक्षांकडे होती. त्यात भाजपचे १८८, शिवसेनेचे १७१ आणि राष्ट्रवादीचे १०७ मतदार होते. प्रत्यक्ष निवडणुकीत ६१८ नगरसेवकांनी मतदारांनी मतदान केलं. त्यात १३ मतदान हे अवैध ठरल्याने विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.
परंतु प्रत्यक्षात मतमोजणीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना ३५७ मते मिळाली. तब्बल १०९ मतांच्या फरकाने त्यांनी दराडेंचा पराभव केला. गितेंच्या विजयात भाजपची अंतर्गत खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गिते यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असले तरी, भाजपने या मतफुटीला हलक्यात न घेता चौकशी सुरु केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.