Nashik MLC Election : विधानपरिषद निवडणुकीसाठीचे महायुतीचे जागावाटप अखेर अंतिम झाले. त्यात नाशिकची जागा शिवसेनेला सुटली असून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र नरेंद्र दराडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत दराडेंचा अर्ज दाखल केला जाणार आहे.
भाजप-शिवसेनेत नाशिकच्या जागेवरुन मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. नाशिकमध्ये सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे होते. त्यामुळे भाजपनेही या जागेवर दावा केला होता. भाजपचे नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे माजी सभापती व मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक गणेश गिते यांनीही जा जागेसाठी अर्ज भरला आहे. परंतु काल रात्री उशिरा निर्णय होऊन ही जागा शिवसेनेला सुटल्याने भाजपच्या एका गटात काहीशी अस्वस्थता पसरली आहे.
गेल्यावेळी २०१८ च्या निवडणुकीत या जागेवर शिवसेनेचे नरेंद्र दराडे हेच विजयी झाले होते. याहीवेळेला त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेत आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. पण दराडेंनी बाजी मारली. मात्र, शिवसेनेला जागा सुटली असली तरी भाजपचे गणेश गिते यांनी आजून माघार घेतलेली नाही. ते पक्षाचा काय आदेश येतो याची वाट पाहून आहेत. गणेश गिते काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
सोमवारी अर्थात आज दुपारी ३ वाजेपर्यंतची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे पुढचे काही तास नाशिकच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. अंतिम क्षणापर्यंत कोण उमेदवारी अर्ज कायम ठेवतं कोण माघार घेतं हे पाहावे लागणार आहे. गणेश गिते यांनी एक अपक्ष व एक भाजपकडून असे दोन अर्ज भरले आहेत. पक्षाने माघार घ्यायला सांगितल्यास ते अपक्ष उमेदवारी कायम ठेऊ शकतात. त्यामुळे गिते यांची माघार होते की बंडखोरी यावर महायुतीचे पुढचे गणित अवलंबून आहे. वरकरणी का तिढा सुटला असला तरी भाजपनेही ही जागा मिळावी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. म्हणूनच गिते यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पक्षादेश आल्यास त्यांना माघार घ्यावी लागणार आहे.
गणेश गिते हे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक असल्याने त्यांच्यासाठी महाजन ही जागा खेचून आणतील असे वाटत होते. परंतु या जागेसाठी एकनाथ शिंदेंनी थेट अमित शहांकडे फिल्डिंग लावल्याने स्थानिक नेत्यांनाही काही करता आले नाही. अखेरीस नाशिकची जागा खेचून आणण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.