Girish Mahajan vs Sunil Kedar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik BJP : नाशिकमध्ये भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभावली, बहुमत असूनही केला मोठा त्याग

Nashik Municipal Corporation : नाशिकमध्ये भाजपने स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. असे असतानाही निवडणुकीनंतर भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेतलं.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिक महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये आज (दि. ६) महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या दिवशी मोठा आणि निर्णायक बदल घडून आला असून, राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने स्वत:कडे स्पष्ट बहुमत असतानाही मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करुन घेतलं आहे. या घडामोडींवर नाशिकमध्ये भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभावल्याचे शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी म्हटलं आहे.

आज ६ फेब्रुवारी नाशिक महापालिकेच्या १७ व्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. भाजपच्या स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती राहिलेल्या हिमगौरी आहेर आडके यांची महापौरपदी निवड झाली. तर भाजपने आपले उपमहापौरपदाचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांना माघार घ्यायला लावली. त्याजागी शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

भाजपकडे १२२ पैकी ७२ नगरसेवक होते. बहुमतापेक्षा दहा नगरसेवक अधिक असतानाही भाजपने मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला सत्तेत सहभागी करुन घेतलं आहे. महाराष्ट्रात महायुती व देशात एनडीए म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. भाजपचे उपमहापौर पदाचे उमेदवार यांना प्रदेश नेतृत्वाच्या निर्णयामुळे नाशिक मनपात महायुती झाल्यामुळे माघार घ्यावी लागली आहे. असे जरी असेल तरी आगामी कुंभ मेळ्याच्या दृष्टीने सर्वांनीच एकत्रित येऊन विकासकामे केली पाहिजेत असा आमचा आग्रह राहील अशी अपेक्षा शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केली.

भाजप प्रदेश नेतृत्वाने शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजप मोठा भाऊ म्हणून सर्वांना बरोबर घेतो व न्याय देतो हे दाखवले आहे असं सुनिल केदार म्हणाले. आता आम्ही निवडून आलेल्या सर्व १२२ नगरसेवकांना बरोबर घेऊन नाशिकच्या विकासाकरिता जोमाने कामाला लागू असे म्हणत निवडून आलेल्या महापौर हिमगौरी आहेर आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचे शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी अभिनंदन केले आहे.

मच्छिंद्र सानप यांचे काय करणार?

दरम्यान भाजपने नाशिकमध्ये महायुती केल्याने व उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाला दिल्याने भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली. त्यामुळे मच्छिंद्र सानप यांचे काय? त्यांना काय जबाबदारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. मच्छिंद्र सानप यांना स्थायी समिती सभापती केलं जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. महापौर व उपमहापौर दोन्ही उमेदवार हे आता मराठा समाजाचे झाले आहेत. अशात मराठा-ओबीसी समीकरण टिकवून ठेवण्यासाठी सानप यांना योग्य ते पद दिले जाईल असे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT